शिवसेनेने राम मंदिरासाठी दान केलेली चांदीची वीटही गायब, संजय राऊत यांनी केली सखोल चौकशीची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अयोध्येतील राम मंदिर देणगी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राम मंदिरासाठी दान केलेले कोट्यवधी रुपये आणि आभूषणांच्या नोंदी गायब असल्याचे समोर आले असून या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटकही केली आहे. आता राम मंदिर उभारणीसाठी दान केलेल्या चांदीच्या विटाही बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. सिंधी समाजानेही राम मंदिराला दान केलेल्या 200 किलो वजनाच्या विटांची कोणतीही पोचपावती मिळाली नसल्याचे म्हटले होते. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दान केलेली 4 किलो वजनाची वीटही गायब असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू-संतांच्या उपस्थितीत 1 कोटी रुपये आणि ही पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती. तरीही, इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही. ती वीट नक्की कुठे गेली? आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Comments are closed.