घटस्फोट दोन व्यक्तींमधील मुद्दा, त्यात मुलांचाही विचार करावा लागतो; घटस्फोटावर ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
अभिनेत्री ईशा देओल हिने पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच या निर्णयावर सविस्तर भाष्य केले आहे. नातेसंबंध, वैयक्तिक निर्णय आणि विभक्त होण्याच्या संवेदनशील प्रक्रियेबाबत बोलताना तिने हा निर्णय अत्यंत वैयक्तिक असल्याचे सांगितले. तसेच अशा परिस्थितीत मुलांचा विचार सर्वात महत्त्वाचा असल्याचेही तिने स्पष्ट केले. ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा म्हणाली की, आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना ती इतरांचा सल्ला घेत नाही. “मला माझे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात. उद्या तो निर्णय योग्य ठरला किंवा चुकीचा, तरी त्याची जबाबदारी माझीच असते. मग तो चित्रपट निवडण्याचा निर्णय असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील. चुका होतात, पण त्या माणसाला अधिक सक्षम बनवतात आणि त्यातून शिकायला मिळते,” असे ती म्हणाली.
भरत तख्तानीपासून विभक्त होण्याबाबत बोलताना ईशाने हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याचे नमूद केले. “ही दोन व्यक्तींमधील बाब असते. आम्ही सार्वजनिक क्षेत्रात असल्यामुळे अशा गोष्टी चर्चेत येतात. पण मी, भरत किंवा त्याचे कुटुंब खासगी आयुष्याबद्दल उघडपणे बोलणारे नाही. त्या काळात आम्हाला त्या परिस्थितीतून जावे लागले आणि त्यात आमच्या मुलींचाही समावेश होता. त्यामुळे प्रत्येक पाऊल अतिशय काळजीपूर्वक उचलावे लागले,” असे ईशाने सांगितले. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.
या कठीण काळात कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्याबद्दलही तिने कृतज्ञता व्यक्त केली. “चांगल्या-वाईट प्रत्येक परिस्थितीत माझे कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांची साथ मला नेहमीच बळ देणारी ठरली,” असे ती म्हणाली.
विभक्त झाल्यानंतरही प्रेम आणि नातेसंबंधांवरील विश्वास कायम असल्याचेही ईशाने स्पष्ट केले. “माझ्या अनुभवांमुळे प्रेमाविषयीचा माझा दृष्टिकोन बदललेला नाही,” असे ती म्हणाली. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी 2024 मध्ये त्यांच्या 11 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला पूर्णविराम देत सामंजस्याने विभक्त होण्याची घोषणा केली होती. या दोघांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत.
Comments are closed.