पदार्पणाआधीच वैभव सूर्यवंशीचा धसका; आयर्लंड संघात मोठी खळबळ!

क्रिकेट आयर्लंड’च्या ऑफिसमध्ये एक मोठ्ठी संधी गमावली याबद्दल खंत व्यक्त केली जात आहे. भारतीय संघाचा आयर्लंड दौरा मार्च महिन्याच्या शेवटी ठरला. त्यामुळे आयर्लंडमधलं मुख्य मैदान अर्थात डब्लिनच्या मॅलाहाईड क्रिकेट स्टेडियम इथे सामने होणार नाहीयेत. १२,००० क्षमतेच्या या मैदानावर संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. हे मैदान उपलब्ध असतं तर १५वर्षीय वैभव सूर्यवंशीचं ऐतिहासिक पदार्पण याच मैदानावर झालं असतं. शुक्रवारी भारतीय आणि आयर्लंड यांच्यात पहिला टी२० सामना होणार आहे. आयर्लंडचे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने त्यांचा संघ कमकुवत झाला आहे. मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी वैभव सूर्यवंशी आहे. १५वर्षीय मुलगा आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार या कल्पनेनेच चाहत्यांनी ही मालिका पाहण्यासाठी तिकीटं बुक केली आहेत. स्टॉरमंट क्रिकेट ग्राऊंड या मैदानाची क्षमता फक्त ५००० इतकीच आहे. आयोजकांना सातत्याने तिकिटांसाठी विचारणा करणारे फोन येत आहेत पण त्यांना काय उत्तर द्यायचं हे त्यांना कळेना झालं आहे.

क्रिकेट आयर्लंडने बेलफास्टमध्ये ही मालिका आयोजित करायचं ठरवलं तेव्हा या भागात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणामुळे या मालिकेच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मात्र जेव्हापासून वैभव सूर्यवंशीचं नाव या मालिकेसाठी जाहीर झालं तेव्हापासून क्रिकेट आयर्लंडकडचं काम वाढलं आहे.

माझा फोन सतत वाजतोच आहे. चाहते सातत्याने तिकिटांसाठी विचारणा करत आहेत असं क्रिकेट आयर्लंडचे प्रमुख ब्रायन मॅकनिस यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. दुर्देवाने स्टॉरमंट मैदानाची क्षमता ५००० इतकीच आहे. डब्लिनला सामना असता तर याच्या तिप्पट लोकांना पाहता आला असता. या सामन्याची तिकीटं अवघ्या काही मिनिटात संपली. तरीही चाहते अजून तिकिटासाठी विचारत आहेत असं ते म्हणाले.

भारतीय माणसं जगभरात सगळीकडे नोकरी-व्यवसाय-शिक्षणाच्या निमित्ताने स्थायिक झालेली असल्यामुळे भारतीय संघ जिथे खेळतो तिथे सामन्यांची तिकीटं हातोहात संपतात. या मालिकेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू वैभव सूर्यवंशी आहे. १५ वर्षांच्या वैभवने आयपीएल स्पर्धेत तडाखेबंद फटकेबाजी करत क्रिकेटजगताचं लक्ष वेधून घेतलं. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून ऑरेंज कॅपने त्याला सन्मानित करण्यात आलं. एका हंगामात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही त्याने नावावर केला. १५व्या वर्षी जगभरातल्या मोठमोठ्या गोलंदाजांविरुद्ध त्याने चौकार-षटकारांची लयलूट केली. अद्भुत अशा फटकेबाजीमुळे क्रिकेटविश्वात वैभवच्या नावाची चर्चा होऊ लागली. वैभवने त्याच्या कामगिरीने आम्हाला त्याची भारतीय संघात निवड करायला भाग पाडलं अशा शब्दात निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मास्टरब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. त्यानंतर दोन दशकं त्याने क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवलं. वैभवला १५व्या वर्षीच वंडरकिड अशी उपाधी मिळाली आहे. वय लहान असल्यामुळे आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर त्याला कोणतीही अडचण येऊ नये यादृष्टीने त्याचे पालकही दौऱ्यादरम्यान त्याच्याबरोबर असणार आहेत. बीसीसीआयने त्यांची व्यवस्था केली आहे.

एकीकडे फुटबॉल वर्ल्डकपचा ज्वर वाढतो आहे. आयर्लंडही त्याला अपवाद नाही. मात्र वैभवच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या शक्यतेमुळे सगळीकडे त्याच्याच नावाची चर्चा आहे. क्रिकेट आयर्लंडच्या प्रमुखांना यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, वैभवविषयी कमालीची उत्सुकता आहे. क्रिकेटचाहते त्याच्याबद्दलच बोलत आहेत. त्याने दमदार खेळ करत भारतीय संघात स्थान पटकावलं आहे. शुक्रवारी तो पदार्पण करेल असं दिसतं. प्रत्येकाला तो क्षण याचि देही याचि डोळा अनुभवायचा आहे. सगळी चर्चा त्याच्याभोवती केंद्रित झाली आहे.

‘या सामन्याच्या तिकिटांसाठी मागणी एवढी आहे की क्रिकेट आयर्लंडने तात्पुरत्या स्वरुपाचे स्टँड्स उभारण्यासंदर्भाला सरकारकडे विनंती केली आहे. आम्ही सरकारच्या प्रतिनिधींशी बोललो. त्यांनी होकार दिला तर तात्पुरत्या स्वरुपाचे स्टँड्स उभारू’, असं क्रिकेट आयर्लंडने म्हटलं आहे.

वैभवच्या निमित्ताने आयर्लंड क्रिकेटची चर्चा होणं अपेक्षित आहे ती होते आहे. २०२७ वर्ल्डकपचा विचार करता आयर्लंड संघाचं लक्ष्य पात्रता फेरीचे सामने आहेत. या दौऱ्यानंतर आयर्लंडचा संघ २०२७ पर्यंत टी२० सामने खेळणार नाहीये. प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने भारताविरुद्धच्या मालिकेने खरंच काही फायदा होईल का अशी चर्चा होती. मात्र वैभवचा भारतीय संघात समावेश झाल्यापासून सगळं चित्र पालटलं आहे. भारतीय संघाचा दौरा यशस्वी झाला तर भविष्यात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या संघांना आमंत्रित करण्याचा क्रिकेट आयर्लंडचा विचार आहे.

फुटबॉल वर्ल्डकप असूनही वैभवसाठी स्वतंत्र जागा देण्यात आल्याचं आयरिश टाईम्सने म्हटलं आहे. बीबीसी नॉदर्न आयर्लंडने दैनंदिन बातम्यांच्या प्रसारणादरम्यान या मालिकेच्या आणि वैभवच्या संभाव्य पदार्पणाच्या बातमीला स्थान दिलं. आयर्लंडचे क्रिकेटपटू वैभवसंदर्भात प्रश्नांची उत्तरं देऊन कंटाळले आहेत. १५वर्षीय मुलगा आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहे याबाबत आयर्लंडचा सलामीवीर रॉड अडेअरला विचारण्यात आलं. टी२० पदार्पणात द्विशतक झळकावण्याचा त्याचा मानस आहे असंही विचारण्यात आलं. तसं झाल्यास मैदानावरच्या क्लबच्या खिडक्या धोक्यात आहेत असा गंमतीदार टोला एका कार्यक्रमादरम्यान लगावण्यात आला. लॉन्गऑन, लॉन्गऑफ बाऊंड्री जवळ असल्याने वैभव तिकडे चौकार, षटकार पिटाळेल यावरही चर्चा झाली.

आयरिश टाईम्ससाठी क्रिकेट वृत्तांकन करणारे पत्रकार नॅथन जॉन्स यांनी वैभवच्या निमित्ताने तिथल्या वातावरणाविषयी सांगितलं. ते म्हणाले, ‘वैभवबद्दलच सतत प्रश्न विचारण्यात येत आहेत. आयर्लंडचे क्रिकेटपटू त्याने कंटाळलेत. आयर्लंडचे सामने कमी होतात. इंग्लंड दौऱ्यापूर्वीचे सराव सामने असंच या मालिकेचं स्वरुप आहे. पण १५वर्षीय वैभवचं आंतरराष्ट्रीय पदार्पण होऊ शकतं हे कळल्यावर चित्रच पालटलं आहे. क्रिकेटमध्ये स्वारस्य नसलेली मंडळीही कान टवकारून आहेत. एक शाळकरी आंतरराष्ट्रीय संघाबरोबर काय करतोय या कल्पनेनेच लोक थरारुन गेले आहेत. त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीविषयी चर्चा सुरू आहे. त्याच्या षटकार लगावण्याच्या क्षमतेविषयी बोललं जातंय’.

वैभवला भारताची कॅप देण्याचा निर्णय झाला तर संघव्यवस्थापनाला टी२० वर्ल्डकपविजेत्या संघातील अभिषेक शर्मा, संजू सॅमसन किंवा इशान किशन यांच्यापैकी एकाला संघातून वगळावं लागेल. हे तिघेही वर्ल्डकप काळात झंझावाती फॉर्ममध्ये होते. जेतेपद मिळवून देण्यात या तिघांचा सिंहाचा वाटा होता. निवडसमितीने टी२० वर्ल्डकपविजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून बाजूला केलं आहे. त्याला संघातूनही वगळण्यात आलं आहे. श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. आयर्लंड मालिकेच्या निमित्ताने श्रेयसही एका नव्या इनिंग्जची सुरूवात करणार आहे.

Comments are closed.