वैभव सूर्यवंशी IN, 7 खेळाडू OUT…; आयर्लंडचा करेक्ट कार्यक्रम करायला पोहोचली टीम इंडिया; संघात

आयर्लंड विरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया: टी-20 क्रिकेटमधील जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ असलेला भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवार 26 जून रोजी बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदानावर खेळवला जाणार आहे, तर दुसरा सामना रविवार 28 जून रोजी याच मैदानावर होईल. मार्च 2026 मध्ये झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले होते. सलग दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनल्यानंतर भारतीय संघाची ही पहिलीच टी-20 मालिका आहे. या मालिकेत भारतीय संघ एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली आणि अनेक नव्या चेहऱ्यांसह मैदानात उतरणार आहे. विश्वचषक 2026 च्या संघात नसलेल्या तब्बल 7 खेळाडूंना या दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे.

संघात कोणाला मिळाली संधी?

मुंबईचा धडाकेबाज फलंदाज आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करणारा श्रेयस अय्यर याने भारतीय टी-20 संघात पुनरागमन केले आहे. त्याला या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. अय्यरने डिसेंबर 2023 मध्ये भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता, त्यानंतर 6 जून 2026 रोजी त्याची अधिकृतपणे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

श्रेयस अय्यर व्यतिरिक्त फिरकीपटू रवी बिश्नोई, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांनीही संघात पुनरागमन केले आहे. या अनुभवी खेळाडूंसोबतच वैभव सूर्यवंशी, प्रिन्स यादव आणि सूर्यांश शेडगे या तीन अनकॅप्ड खेळाडूंना पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. वैभव आणि प्रिन्स यांची निवड 6 जून रोजीच झाली होती, तर सूर्यांश शेडगेला दुखापतग्रस्त नितीश कुमार रेड्डीच्या जागी संघात सामील करण्यात आले आहे.

संघातून कोणाला डच्चू आणि विश्रांती?

नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवला आयर्लंड मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्यासोबतच डावखुरा फलंदाज रिंकू सिंग आणि चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव यांनाही संघातून वगळण्यात आले आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणारे स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनाही या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय मोहम्मद सिराज आणि वरुण चक्रवर्ती यांची 6 जून रोजी संघात निवड झाली होती, मात्र सिराजला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली आहे, तर वरुण चक्रवर्ती आयपीएल 2026 दरम्यान झालेल्या दुखापतीतून अजूनही पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू या मालिकेला मुकणार आहेत.

संघात आलेले खेळाडू (IN) : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, सूर्यांश शेडगे, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव आणि रवी बिश्नोई.

संघातून बाहेर गेलेले खेळाडू (OUT) : सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि वरुण चक्रवर्ती.

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ (India’s T20 World Cup 2026 squad) :

श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, अक्षर पटेल, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई.

हे ही वाचा –

‘भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..’ रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?

Comments are closed.