IND Vs IRE – नव्या दमाचा कर्णधार; श्रेयस अय्यरने पदार्पणातच मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना बेलफास्टच्या मैदानावर सुरू झाला असून टीम इंडियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना श्रेयस अय्यसरसाठी विशेष ठरलाय. कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच सामना विक्रमाला गवसणी घालणारा ठरलाय. कारण मैदानात उतरताच श्रेयस अय्यरने रोहित शर्माचा एक विक्रम मोडित काढला आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2026 चा विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवच्या जागी बीसीसीआयने भविष्यातील नियोजन लक्षात घेऊन श्रेयस अय्यरकडे या फॉर्मेटची धुरा सोपवली आहे. तब्बल 936 दिवसांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन करणाऱ्या श्रेयसने कर्णधार म्हणून मैदानात पाऊल ठेवताच एक मोठा इतिहास रचला. तो आता हिंदुस्थानकडून टी-20 मध्ये नेतृत्व करण्यापूर्वी देशांतर्गत आणि आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यरने तब्बल 114 टी-20 सामन्यांमध्ये वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व केल्यानंतर अखेर टीम इंडियाने कर्णधारपद सांभाळले आहे. यापूर्वी हा विशेष विक्रम ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने 80 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी चोख पार पाडली. याच अनुभवाच्या जोरावर त्याने हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व केले होते. या यादीत आता श्रेयस अय्यर 114 सामन्यांसह अव्वल स्थानी पोहोचला असून, त्याच्या मागे रोहित शर्मा (80), विराट कोहली (72), केएल राहुल (42), ऋषभ पंत (30) आणि शिखर धवन (21) अशा खेळाडूंचा क्रमांक लागतो.

कर्णधारपदाच्या या ऐतिहासिक पदार्पणासोबतच श्रेयस अय्यरने आणखी एका विक्रमी यादीत स्थान मिळवले आहे. वयाच्या 31 व्या वर्षी आणि 202 व्या दिवशी हिंदुस्थानी टी-20 संघाची धुरा सांभाळणारा श्रेयस हा हिंदुस्थानचा तिसरा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. या यादीत शिखर धवन पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने वयाच्या 35 व्या वर्षी आणि 232 व्या दिवशी पहिल्यांदा देशाचे नेतृत्व केले होते, तर सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे. या दोघांनंतर श्रेयस अय्यरने रोहित शर्मा (30 वर्षे 234 दिवस) आणि केएल राहुल (30 वर्षे 143 दिवस) यांना मागे टाकत या क्लबमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

Comments are closed.