आजपासून पावसाचा जोर वाढणार
दमदार एंट्रीनंतर ओढ दिलेल्या पावसाने कोकणासह राज्यातील अनेक भागांत जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. पावसाचा जोर उद्या आणखी वाढणार असून धुंवाधार बरसणार असल्यामुळे हवामान खात्याकडून ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
मुंबईत जोरदार बरसल्यामुळे जनजीवन विस्कळीत केल्यानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी ढगांआडून निघणाऱ्या सूर्यकिरणांमुळे आभाळ सोनेरी भासत होते.
मुंबईत मात्र गेले दोन दिवस पाऊस थांबला आहे. मात्र कोकणात पुन्हा एकदा पावसाने दमदार बरसायला सुरुवात केली आहे. हा पाऊस मुंबईसह संपूर्ण राज्यात सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शनिवारी राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याने हवामान खात्याने काही जिह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर काही जिह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, 2 ते 8 जुलै या कालावधीत अरबी समुद्र, किनारी भागात कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण होणार असल्याने अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचेही हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले.
24 जिह्यांना ऑरेंज अलर्ट
किनारपट्टी भागात ताशी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. यातच पावसाचा जोर राहणार आहे. त्यामुळे 24 जिह्यांना खबरदारीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, ठाणे, नाशिक, रायगड, मुंबईसह विदर्भातील जवळपास सर्वच जिह्यांचा समावेश आहे. जुलैच्या 10 तारीखपर्यंत हा पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments are closed.