पुढचे काही दिवस भेटायचं नाही अन्…; केतनला संपवल्यानंतर सिया अन् चेतनचा प्लॅन, पुरावे नष्ट करण

लोणावळा/पुणे: लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात दररोज नवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ हत्येचा (Ketan Agarwal Death Case) कट रचला नाही, तर गुन्ह्यानंतर पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी अत्यंत हुशारीने नियोजन केले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे.(Ketan Agarwal Death Case)

Pune Ketan Agarwal Death Case : संशय टाळण्यासाठी अंतर ठेवण्याचा होता प्लॅन

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालला दरीत ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतनने ठरवले होते की, ते पुढील काही दिवस एकमेकांना अजिबात भेटणार नाहीत. केतनचा मृत्यू हा केवळ एक अपघात आहे असे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अचानक त्यांच्या भेटीगाठी वाढल्यास पोलिसांना किंवा कुटुंबीयांना त्यांच्यावर संशय येईल, याच भीतीने त्यांनी हत्येनंतर एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.

Pune Ketan Agarwal Death Case :  मोबाईल चॅट्स केले डिलीट; गुपित लपवण्याचा प्रयत्न

दोघांमधील प्रेमसंबंध आणि हत्येच्या कटाची माहिती चुकूनही कोणाच्या हाती लागू नये, यासाठी या दोघांनी आपल्या मोबाईलमधील सर्व चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स डिलीट (Delete) करून टाकले होते. पोलिसांच्या पकडीतून सुटण्यासाठी आणि कोणताही पुरावा मागे न ठेवण्यासाठी या दोन्ही आरोपींनी सर्व शक्य प्रयत्न केले होते.

Pune Ketan Agarwal Death Case :  डिलीट डेटा रिकव्हर करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये

आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी पोलीस तांत्रिक तपासाच्या जोरावर त्यांचे बिंग फोडणार आहेत. लोणावळा पोलिसांनी दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त केले असून ते तातडीने फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये (Forensic Lab) पाठवले आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने या मोबाईलमधील डिलीट केलेले व्हॉट्सॲप चॅट्स, मेसेजेस आणि इतर डेटा पुन्हा रिकव्हर (पुनर्प्राप्त) केला जाणार आहे. हा डेटा हाती आल्यानंतर केतन अग्रवाल हत्येचा संपूर्ण कट कोर्टात सिद्ध करणे पोलिसांना अधिक सोपे होणार आहे.

Pune Ketan Agarwal Death Case : प्रियकर चेतनचा पोलिसांसमोर खुलासा

पोलिसांच्या चौकशीत चेतन चौधरीने एक वेगळीच बाजू मांडली आहे. चेतनच्या म्हणण्यानुसार, त्याला सियासोबत पळून जाऊन कुठेतरी दूर नव्याने आयुष्य सुरू करायचे होते. मात्र, सियाचाच असा आग्रह होता की पळून जाण्याने काही होणार नाही, कारण तिचे कुटुंब प्रचंड श्रीमंत आहे आणि ते त्यांना जगाच्या पाठीवर कुठूनही शोधून काढतील. या लग्नातून सुटकेचा आणि केतनपासून सुटका मिळवण्याचा ‘खून’ हाच एकमेव उपाय असल्याचे सियानेच निश्चित केले होते, असा दावा चेतनने केला आहे.(Ketan Agarwal Death Case)

Pune Ketan Agarwal Death Case :  “चेतन रडला अन् स्वतःकडे जबाबदारी घेतली”; सियाने आळ उलटवला

चेतनच्या या दाव्याच्या पूर्णपणे उलट कहाणी सियाने पोलिसांना सांगितली आहे. सियाचा आरोप आहे की, केतनच्या खुनाचा कट सुरुवातीपासूनच चेतनने रचला होता. लोहगडावर झालेल्या पहिल्या दोन ट्रेकमध्ये सियाला केतनला दरीत ढकलण्याचे धाडस झाले नाही. १४ जून रोजी झालेला प्रयत्न जेव्हा अयशस्वी ठरला, तेव्हा चेतन हताश झाला आणि रडू लागला. त्यानंतर त्याचा संयम सुटला आणि त्याने सियाला स्पष्ट बजावले की, “तुला हे जमणार नाही, आता ही जबाबदारी मी घेतो आणि हे काम पूर्ण करतो.”

Pune Ketan Agarwal Death Case : महाबळेश्वरमध्ये घालवायचा होता एकांतात वेळ!

तर एका मराठी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चेतनने तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्यामागे एक खास हेतू होता. त्याला सियाला केतनच्या बंधनातून लवकरात लवकर मुक्त करायचे होते, जेणेकरून केतनचा काटा निघाल्यानंतर त्या दोघांना महाबळेश्वरमध्ये एकत्र जाऊन एकांतात वेळ घालवता येईल. धक्कादायक बाब म्हणजे, केतनची हत्या केल्यानंतरही हे दोघे सतत एकमेकांच्या संपर्कात होते. तपास अधिकाऱ्यांच्या मते, पोलीस कोठडीत असलेल्या या दोन्ही आरोपींच्या चेहऱ्यावर आपल्या कृत्याबद्दल कसलाही पश्चात्ताप दिसून आलेला नाही.

हेदेखील वाचा

Comments are closed.