सख्ख्या भावनेही आता सियाला तोंडावर पाडलं; पोलिसांना दिली केतन अग्रवाल प्रकरणाला नवं वळण देणारी

केतन अग्रवाल पुणे लोहगड प्रकरण: लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Ketan Agrawal ) आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरीची (Chetan Choudhari) लोहगडाच्या पायथ्याशी आणून चौकशी करण्यात आली. काल रात्री 11 वाजता पोलिसांनी दोन्ही आरोपींना लोहगड परिसरात आणून चौकशी केली. दोन्ही आरोपींनी लोहगडावर जाण्यासाठी कोणता मार्ग वापरला याची चौकशी करण्यात आली. तसेच आता पोलीस सियाच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याचदरम्यान, सियाच्या भावाने देखील पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती सांगितली आहे.

आता भावानेही सियाला तोंडावर पाडलं, पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती- (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

केतन अग्रवाल हत्या प्रकरणी तपासाला आता वेग आला आहे. सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत असून काल आरोपी सिया गोयलच्या भावाची पोलिसांकडून 10 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत सियाच्या भावाने चक्रावून टाकणारी माहिती दिली. पोलीस चौकशीत सियाने मला केतनसोबत लग्न करायचं नाही, हे कुटुंबीयांना सांगितल्याचं म्हटलं होतं. पंरतु सियाच्या भावाने तिला तोंडावर पाडणारा जबाब पोलिसांना दिला आहे. केतनशी लग्न करायचं नाही, हे सियानं कुणालाही सांगितलं नव्हतं, असं या चौकशीत सियाचा भाऊ साहिल गोयलने पोलिसांना सांगितलं. सियानं मला किंवा कुटुंबीयांना काहीही सांगितलं नाही, सियानं सांगितलं असतं तर कुटुंबीयांनी तिचं लग्न लावलं नसतं, असंही साहिल गोयलने म्हटलं आहे.

सिया आणि चेतनची पहिली ओळख क्रिकेट सामन्यांदरम्यान झाली- (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

केतन अग्रवालची हत्या करणाऱ्या सिया आणि चेतनची पहिली ओळख क्रिकेट सामन्यांदरम्यान झाली होती. सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे एकत्र क्रिकेट खेळायचे. सिया तिचा भाऊ साहिलसोबत क्रिकेट सामने पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी जात असताना तिची चेतनशी ओळख झाली. त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीत दोघांची पुन्हा भेट झाली आणि भेटीगाठी वाढत गेल्या. क्रिकेटच्या मैदानावर झालेली ओळख पुढे प्रेमसंबंधात बदलली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल दोन हजार चार फोन कॉल झाले असून, त्यांचा एकूण संवाद सुमारे 238 तासांचा होता.

केवळ टक्कलच नव्हे तर केतनची आणखी एक गोष्ट खटकायची- (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

सिया आणि केतन यांच्या लग्नासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी मोठी तयारी केली होती. मात्र, सियाला केतन हा मनापासून कधीच पसंत पडला नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील दोन उणीवा सियाला खटकायच्या. केतनला टक्कल होते. तो केसांचा टोप वापरत होता. ही गोष्ट अनेकांना माहिती नव्हती.  याशिवाय, केतन बोलताना अडखळायचा. सिया आणि केतनचे लग्न ठरले तेव्हा गोयल कुटुंबाला या गोष्टीची माहिती होती. मात्र, त्यांना याचे फारसे विशेष वाटले नाही. परंतु, या दोन गोष्टींमुळे सियाला कितीही प्रयत्न करुनही केतन अग्रवाल पसंत पडत नव्हता. याशिवाय, मुख्य गोष्ट म्हणजे सिया गोयल हिचे चेतन चौधरी याच्यावर प्रेम होते.

नेमकं प्रकरण काय? (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

बालीचा बेत फसल्यानंतर, 14 जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र, त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे किंवा धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पूर्ण होऊ शकला नाही. 19 जून रोजी दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. मात्र सियाने केतनकडे 18 जून रोजीच लोहगडला ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला. ठरलेल्या कटानुसार, तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. केतन पुढे असताना चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

संबंधित बातमी:

Ujjwal Nikam On Ketan Agrawal Pune Lohagad Case: केतन अग्रवाल प्रकरणात तो भाग महत्वाचा ठरणार; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती होताच उज्वल निकम यांचं मोठं विधान

Comments are closed.