भारतासह 8 संघ 2028 च्या टी-20 वर्ल्डकपसाठी क्वालिफाय; यजमानपदाचा पाकिस्तानला फायदा, कोणकोणते सं
ICC महिला T20 विश्वचषक 2028 पात्रता : आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2028 च्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली असून, भारत आणि पाकिस्तानसह एकूण 8 संघांनी या स्पर्धेसाठी थेट क्वालिफाय केले आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका विरुद्ध स्कॉटलंड सामन्याच्या निकालानंतर या आठही संघांची नावे अधिकृतपणे स्पष्ट झाली आहेत.
पात्रतेचे समीकरण अन् दोन ग्रुप
महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 12 संघ सहभागी झाले असून, त्यांची 6-6 च्या दोन ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. नियमांनुसार, दोन्ही ग्रुपमधील टॉप-4 संघांना 2028 मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या पुढील टी-20 वर्ल्ड कपसाठी थेट प्रवेश मिळणार होता.
ग्रुप ‘ए’ मधून भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या चार संघांनी 2028 च्या वर्ल्ड कपमधील आपले स्थान पक्के केले आहे. पाकिस्तानचा संघ ग्रुप ‘ए’ मध्ये सलग 4 सामने हरल्यामुळे पाचव्या स्थानावर फेकला गेला. मात्र, आगामी वर्ल्ड कपचे यजमानपद पाकिस्तानकडे असल्याने त्यांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे त्यांना क्वालिफायिंग राउंड खेळावा लागणार नाही. ग्रुप बी ग्रुपमधून इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंका या चार संघांनी टॉप-4 मध्ये राहत थेट पात्रता मिळवली आहे.
10 व्या संघाचा फैसला कसा होणार?
स्पर्धेतील 9वा संघ (यजमान पाकिस्तान) निश्चित झाल्यानंतर, 10 व्या संघाचा निर्णय 6 जुलै 2026 च्या कट-ऑफ तारखेला आयसीसी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय रँकिंगच्या (ICC Rankings) आधारे केला जाईल. सध्या आयर्लंडचा संघ 201 रेटिंग गुणांसह नवव्या स्थानावर आहे, त्यामुळे आयर्लंड हा 10 वा संघ म्हणून पात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. उर्वरित संघांना मात्र पात्रता फेरी (Qualifying Rounds) खेळावी लागेल.
स्कॉटलंडची हुकलेली संधी
स्कॉटलंडकडे श्रीलंकेला पराभूत करून 2028 च्या वर्ल्ड कपमध्ये थेट जागा मिळवण्याची सुवर्णसंधी होती. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्कॉटलंडने 151 धावांचे मजबूत आव्हान उभे केले होते. प्रत्युत्तरात त्यांनी श्रीलंकेचे 6 फलंदाज अवघ्या 118 धावांवर बाद केले होते. स्कॉटलंड हा सामना जिंकेल असे वाटत असतानाच, शेवटच्या 3 षटकांत श्रीलंकेने सामन्याचा नूर पलटवला आणि 1 चेंडू व 3 गडी राखून थरारक विजय मिळवला. यामुळे स्कॉटलंडची थेट पात्रतेची संधी हुकली.
आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी
जून महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबाद येथे झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत या पात्रता रचनेची घोषणा करण्यात आली होती. तसेच पुढील वर्षी श्रीलंकेत होणाऱ्या पहिल्या ‘आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या स्वरूपावरही शिक्कामोर्तब झाले आहे. 6 जुलैच्या कट-ऑफ रँकिंगनुसार, यजमान श्रीलंकेसह टॉप-5 मध्ये असणारे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.