विलास घुले प्रकरणात मोठी घडामोड, खासदार बजरंग सोनवणेंच्या पुत्राची आज SIT कडून चौकशी!

बीड क्राइम विलास घुले प्रकरण: बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले (Vilas Ghule) याच्या हत्या प्रकरणाला आता अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (SIT) आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांचे चिरंजीव सौरव सोनवणे (Saurabh Sonwane) यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव सोनवणे आज दुपारी स्वतः केज पोलीस ठाण्यात (Kej Police Station) हजर राहून या चौकशीला सामोरे जाणार आहेत.

Beed Crime Vilas Ghule Case: पुरवणी जबाबात खासदार पुत्राचे नाव

विलास घुले हत्या प्रकरणात फिर्यादीने नोंदवलेल्या पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या गंभीर प्रकरणामध्ये सौरव सोनवणे यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करावा, अशी मागणी करत आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावँत यांनी पुरवणी जबाबात नाव आल्यामुळे सत्य शोधण्यासाठी एसआयटीने सौरव सोनवणे यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. तर, “पोलीस प्रशासन ज्या ज्या वेळी तपासासाठी बोलावेल, त्या त्या वेळी आम्ही पूर्ण सहकार्य करू,” अशी भूमिका यापूर्वीच खासदार बजरंग सोनवणे आणि सौरव सोनवणे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केली होती. त्यानुसार आज ते स्वतःहून पोलिसांसमोर हजर होत आहेत.

Beed Crime Vilas Ghule Case: नेमकं काय आहे प्रकरण?

केज तालुक्यातील टाकळी येथे 20 जूनच्या रात्री हत्येचा कट रचून एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आलेल्या विलास घुले या निष्पाप तरुणावर आरोपींनी जीवघेणा वार केला, ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर बीड जिल्हा संतप्त झाला होता. मुख्य आरोपींच्या अटकेसाठी तब्बल तीन दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तसेच विलास घुले यांचा मृतदेह तब्बल नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांनी प्रशासनाचा निषेध केला होता. पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपासाची चक्रे फिरवत विविध ठिकाणाहून एकूण 9 आरोपींना अटक केली आहे.

Beed Crime Vilas Ghule Case: धनंजय मुंडेंचा विधानसभेत आवाज; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

या प्रकरणाची पडसाद थेट राज्याच्या विधिमंडळात उमटले. माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला. “विलास घुले हत्येमागील खरा सूत्रधार कोण आहे, याची पाळेमुळे पोलिसांनी खणून काढावीत,” अशी मागणी त्यांनी केली. एवढेच नव्हे तर, धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणाच्या सखोल तपासाबाबत आणि दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी लेखी निवेदन दिले आहे. आज दुपारी होणाऱ्या सौरव सोनवणे यांच्या चौकशीनंतर आता तपास यंत्रणा कोणती भूमिका घेते आणि या प्रकरणात आणखी काय खुलासे होतात, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Beed News : विलास घुले हत्याकांड प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा लक्ष्मण हाकेंना फोन; खासदार बजरंग सोनवणेंच्या पुत्रालाही अटक? पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत म्हणाले…

Comments are closed.