आरोग्य विभागात 5,223 पदांची मेगाभरती; डॉक्टर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या जागा भरणार
सरकारी नोकरींची प्रतीक्षा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात लवकरच तब्बल 5 हजार 223 नवीन पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भातील अधिकृत पदनिर्मितीचा शासन निर्णय म्हणजेच जीआर नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य विभागात हजारो तरुणांना नोकरी मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱयांची आणि तज्ञांची पदे रिक्त असल्याने सर्वसामान्यांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर, राज्यातील आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन 5 हजार 223 पदांच्या निर्मितीमुळे आरोग्य विभागाचा कणा अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार, या मेगाभरतीमध्ये आरोग्य विभागातील वेगवेगळ्या श्रेणीतील आणि संवर्गातील पदांचा समावेश असेल. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, तज्ञ डॉक्टर, परिचारिका (स्टाफ नर्स), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी (फार्मसिस्ट) तसेच इतर तांत्रिक व अतांत्रिक प्रशासकीय पदांचा प्रामुख्याने समावेश आहे.
n प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हास्तरीय रुग्णालयांपर्यंत आवश्यकतेनुसार या जागांचे वाटप केले जाणार आहे. पदनिर्मितीचा शासन निर्णय जारी झाल्यामुळे आता लवकरच या सर्व जागांसाठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतील. आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि निकषांची सविस्तर माहिती आगामी जाहिरातीमध्ये स्पष्ट केली जाईल.
Comments are closed.