ये रे… ये रे पावसा! पुणेकरांचे डोळे आभाळाकडे!!
आधीच ताण दिलेल्या पावसाने शहर आणि जिल्ह्यात गेल्या रविवारी झलक दाखविली खरी; पण अवघ्या दोन दिवसांची ‘पाहुणेगिरी’ करत त्याने पुन्हा दडी मारली आहे. शहरात भेडसावणारी पाणीटंचाई आणि गावखेड्यांत रखडलेली शेतीची कामे, यामुळे शेतकऱ्यांसह पुणेकरांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. ‘ये रे… ये रे पावसा’ अशीच सर्वांची भावना आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र मान्सूनचे आगमन झाले; पण हा दिलासा तात्पुरता होता कारण त्यानंतर दोन दिवस तुरळक पावसाची नोंद झाली. आता मान्सून कुठे गायब झाला आणि पुन्हा कधी बरसणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शहरात गेल्या रविवारी आणि सोमवारी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत त्याने सपशेल दडी मारली. दिवसभर ढगाळ वातावरण असतानाही पाऊस पडला नाही. परिणामी तापमानातही वाढ झाली आहे. पुढील दोन दिवसांत मात्र आकाश ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामानशास्त्रज्ञांनी दिले आहेत.
पुण्यात सोमवारी नैऋत्य मौसमी पावसाचे आगमन झाले. दोन दिवस मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे पुणेकरांच्याव आशा पल्लवित झाल्या. दर वर्षीप्रमाणे जूनमधील पावसाला उशिरा का होईना सुरुवात झाली, अशी चर्चा सुरू असताना गुरुवारी दुपारी आणि शुक्रवारी दिवसभरात पाऊस पडलाच नाही. पावसाने परत दडी मारली. दोन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी तापमानात वाढ होऊन सरासरीच्या तुलनेत चार अंशांनी जास्त कमाल ३४.३ आणि किमान २२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
२६ दिवसांत केवळ ४७ मिलिमीटर पाऊस
हवामानशास्त्र विभागाच्या नोंदींनुसार, पुण्यात २६ जूनपर्यंत सरासरी १२८.९ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा मान्सूनपूर्व पावसानेही निराशा केली. त्यामुळे आत्तापर्यंत एक ते २६ जून या कालावधीत ४७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पुढील चार दिवसांत पाऊस ही तूट भरून काढणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
धरणांतील साठा तळाशी
जून महिना संपत आला तरी अद्यापी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसला नाही. सध्या खडकवासला धरणात १७.३३ टक्के, पानशेतमध्ये १७.७८ टक्के, वरसगावमध्ये ११.८१ टक्के, तर टेमघर धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसांमध्ये या चारही धरण क्षेत्रात समाधनकारक पाऊस न झाल्यास पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सूनवर ‘एल-निनो’चा मोठा प्रभाव पडला आहे. ६ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊनदेखील पावसाने पुण्यासह राज्यभरात दडी मारली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र, अद्याप राज्यातील काही भागात माधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
पुणे शहारला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठल्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पुढील काही दिवसांमध्ये या चारही धरणसाखळीत समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. गतवर्षी २७ जून रोजी खडकवासला धरणात ६०.६६ टक्के, पानशेतमध्ये ४१.६४ टक्के, वरसगावमध्ये ५९.९७ टक्के, तर टेमघरमध्ये ३०.३९ टक्के उपयुक्त पाणीसाठी उपलब्ध होता. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या चारही धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मान्सूनचा पहिला महिना संपत आलेला असतानाही धरणांमध्ये पाण्याची आवक झालेली नाही.
पाणीसाठा (टक्क्यांत)
धरण सध्याचा गतवर्षीचा
खडकवासला १७.३३ ६०.६६
पानशेत १७.७८ ४१.६४
वरसगाव ११.८१ ५९.९७
टेमघर ०.० ३०.३९
Comments are closed.