अजूनही गुहेत राहणारे गाव.

भारतात अनेक स्थानी आजच्या आधुनिक युगातही सहस्रावधी वर्षांपूर्वीची पारंपरीक जीवनशैलीच मानली जात आहे. मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातले भीमबेटका हे ग्राम सध्या याच विषयामुळे चर्चेत आहे. या गावातील लोक आजही गुहांमध्ये निर्माण केलेल्या घरांमध्ये राहतात. ही घरे ‘शैलाश्रित घरे’ म्हणून परिचित आहेत. ‘शैलाश्रीत’ याचा अर्थ शीला किंवा खडकाळ गुहा खोदून निर्माण केलेली घरे असा होतो. हजारो वर्षांपूर्वी अशी घरे निर्माण करण्यात आली. आजही याच घरांचा उपयोग वस्तीसाठी केला जात आहे. पुरातन काळी मानव वनांमध्ये हिंडून शिकार करीत असे. कंदमुळे आणि फळे गोळा करीत असे आणि त्यावर आपला चरितार्थ चालवत असे. दिवसभर पोटापाण्यासाठी हा उद्योग केल्यानंतर तो सूर्य मावळल्यावर विश्रांतीसाठी अशा घरांमध्ये येत असे. ही घरे बळकट खडकांमध्ये खोदलेली असल्याने ती पडण्याचा किंवा त्यांची पावसाने हानी होण्याचा प्रश्न नसे.

या प्राचीन गुहांमध्ये त्याकाळी काढलेली भित्तीचित्रे आजही अस्तित्वात आहेत. या चित्रांवरुनच या गुहांचे वय शोधून काढण्यात आले आहे. आज माणसे पूर्वीप्रमाणे वन्य प्राण्यांची शिकार करीत नाहीत. तसेच त्यांच्या आवश्यकतांमध्येही मोठे परिवर्तन झाले आहे. आजची येथील माणसे, शेती करतात किंवा नोकरी किंवा छोटे मोठे व्यवसाय करतात. तथापि, त्यांची वस्ती अशाच घरांमध्ये असते. गावात आधुनिक पद्धतीचे बांधकाम असलेली घरे अगदी कमी आहेत. या गावात मानववंशशास्त्राचे आणि इतिहासाचे अभ्यासक आणि संशोधक नेहमी येत असतात. वनवासी मानवांची जीवनशैली कशी होती, हे या गुहाघरांवरुन त्यांना ताडता येते.  अलिकडच्या काळात लोकसंख्या वाढल्याने ही शैलाश्रित घरे पुरे पडेनाशी झाली आहेत. त्यामुळे अनेकांना नव्या घरांमध्ये रहावे लागते. तथापि, ही पुरातन घरे आजही आपला मान राखून आहेत, हे या गावाचे प्रमुख वैशिष्ट्या मानले जाते.

 

Comments are closed.