काँग्रेसने उत्तर प्रदेशात निम्म्या जागांची मागणी केली आहे.

अखिलेश यादव यांची वाढविली चिंता मायावतींचे केले कौतुक

लखनौ : उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरून इंडी आघाडीत शह आणि काटशहाचा खेळ सुरू झाला आहे. काँग्रेसचे नवनियुक्त उत्तरप्रदेश प्रभारी राजेंद्र पाल गौतम यांनी समाजवादी पक्षासमोर समान जागांवर निवडणूक लढविण्याची मागणी ठेवली आहे. गौतम यांनी राज्यातील निम्म्या जागांवर दावा सांगण्यासोबत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे कौतुक केल्याने उत्तरप्रदेशच्या राजकारणात नव्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

आघाडीत सप आणि काँग्रेसला समान जागा मिळाव्यात अशी माझी इच्छा आहे. परंतु दोन्ही पक्षांच्या नेतृत्वादरम्यान चर्चा होईल, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यासंबंधी आताच घोषणा करण्याचा मला अधिकार नाही. परंतु आम्ही निश्चितपणे निम्म्या जागांसाठी स्वत:चे म्हणणे मजबुतीने मांडणार आहोत असे गौतम यांनी स्पष्ट पेले आहे.

403 जागांचे गणित

उत्तरप्रदेशात एकूण 403 विधानसभा मतदारसंघ आहेत, 10 वर्षांपूर्वी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करत निवडणूक लढविली होती, त्यावेळी सपने 298 आणि काँग्रेसने 105 जागांवर उमेदवार उभे केले होते. परंतु अनेक जागांवर दोन्ही पक्षांदरम्यान ‘मैत्रिपूर्ण लढत’ही झाली होती. त्यावेळी भाजपच्या प्रचंड लाटेत या आघाडीला पराभव पत्करावा लागला होता. यानंतर दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आले, ज्यात त्यांना मोठे यश देखील मिळाले. उत्तरप्रदेशच्या 80 लोकसभा मतदारसंघांपैकी सपने 62 लढवून 37 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 17 पैकी 6 जागांवर विजय मिळविला होता.

काँग्रेसला अधिक जागांची अपेक्ष्

लोकसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीत सपकडून सुमारे 150 जागांची मागणी करू शकतो. समाजवादी पक्ष काँग्रेसला 70-80 हून अधिक जागा सोडण्यास तयार नसल्याचे समजते. अशास्थितीत गौतम यांचा समान हिस्सेदारीचे वक्तव्य थेट स्वरुपात अखिलेश यादव यांच्या पक्षावर दबाव टाकण्याच्या रणनीतिचा हिस्सा मानण्यात येत आहे. 2017 मध्ये सप सत्तेवर असताना त्याने काँग्रेसला 105 जागा सोडल्या होत्या. यामुळे यावेळी काँग्रेसचा हिस्सा आणखी मोठा असायला हवा असे काँग्रेसच्या नेत्यांचा म्हणणे आहे.

काशीराम कार्ड

राजेंद्र पाल गौतम यांनी बसप प्रमुख मायावती यांनाही सोबत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. राज्यघटना आणि लोकशाहीला मजबूत करण्यासाठी बहुजन समाजाच्या  मुद्द्यांवर काम करणाऱ्या सर्व लोकांनी या दडपशाहीच्या सरकारच्या विरोधात एकजूट व्हायला हवे. मायावती या आमच्या समाजाच्या मातब्बर नेत्या आहेत आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो असे उद्गार गौतम यांनी काढले आहेत.

Comments are closed.