एक सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारत
पंतप्रधानांची ‘मन की बात’ : स्वदेशी ताकद वाढत असल्याचा दावा
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’द्वारे देशवासियांशी संवाद साधताना भारत समुद्रापासून आकाशापर्यंत सुरक्षित असल्याचा दावा केला. देशाने केलेली ही प्रगती ‘आत्मनिर्भर’ तत्त्वावर आधारित असल्याचे सांगताना त्यांनी विविध दाखलेही दिले. या महिन्यात डीआरडीओने स्वदेशी बनावटीच्या लाँग रेंज लँड अटॅक क्रूझ मिसाईलची यशस्वी चाचणी केली. केवळ जून महिन्यातच देशाने हवाई वाहतूक क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. ‘मेड इन इंडिया’ अभियानांतर्गत विकसित केलेल्या सी-295 विमानाने आपले पहिले यशस्वी उ•ाण पूर्ण केले. सध्या भारतात अशा 40 विमानांची निर्मिती होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या 135 व्या भागाच्या माध्यमातून पुन्हा एकदा देशातील आणि जगभरातील भारतीयांशी संवाद साधला. भारत विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने नवनवीन उंची गाठत आहे आणि येथील नागरिकांची मेहनत व नाविन्यपूर्णता हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. देशाची उपलब्धी ही केवळ सरकारचा परिणाम नाही, तर 1.4 अब्ज भारतीयांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे, जे भारताला विकासाच्या नव्या दिशेने वेगाने पुढे नेत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. अलीकडेच मला कोलकाता येथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधन आणि आयएनएस अग्रय या नौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आल्या. या नौकांची रचना आणि उत्पादन यापासून सर्व काही स्वदेशी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
योगासन चॅम्पियनशिपचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात म्हणाले की, आंतरराष्ट्रीय योग दिनाने जगाला पुन्हा एकदा जोडले आहे. जगभरातील 2,500 हून अधिक ठिकाणी विविध योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तर भारतात लाखो लोकांनी योग कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद येथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचाही उल्लेख केला. या स्पर्धेत भारताने 102 सुवर्ण पदकांसह एकूण 114 पदके जिंकली. पदक तालिकेत भारताने प्रथम क्रमांक पटकावला.
नागालँडच्या फुटबॉल लीगची प्रशंसा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण आणि मुलांना फुटबॉलशी जोडण्यासाठी नागालँडमध्ये आयोजित केल्या जात असलेल्या दोन लीगची प्रशंसा केली. ‘नागालँड बेबी लीग’ या नावावरून लहान मुलांसाठीची ही एक सामान्य लीग आहे असे वाटू शकते, पण तसे नाही. ही 5 ते 10-12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी एक असाधारण फुटबॉल लीग आहे, जी त्यांच्यातील प्रतिभा विकसित करते आणि त्यांना प्रगती करून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी प्रेरित करते, असे पंतप्रधान म्हणाले. नागालँडमधील अधिक मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने ही लीग सुरू करण्यात आली होती. या लीगने तीन वर्षे पूर्ण केली असून मुलांच्या मनावर तिचा सकारात्मक परिणाम झाला आहे.
Comments are closed.