पालघरचा माहीम-सावरेपाडा रस्ता बनला डेंजर झोन, साकव कोसळण्याची भीती
माहीम ग्रामपंचायत हद्दीतील सावरेपाडा ते चौकीपाडा या महत्त्वाच्या अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यावर असलेला साकवही धोकादायक स्थितीत असून तो कोसळला तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. माहीम-सावरेपाडा रस्ता ‘डेंजर झोन’ बनला असून साकवची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
माहीम-सावरेपाडा ते चौकीपाडा मार्गावरील रस्ता आणि त्यावरील साकवावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या जड वाहनांमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. माहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रीती पाटील, उपसरपंच नरोत्तम पाटील, सदस्य कुणाल नारले यांनी उपजिल्हाधिकारी महेश सागर यांना पत्र देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्ता व साकवाची दुरुस्ती करावी तसेच भविष्यात अशा प्रकारची हानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात अशी मागणी करण्यात आली आहे. माहीम ग्रामपंचायतीकडून पाठवण्यात आलेल्या या पत्रामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
– सततच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्डे पडले असून साकवाचीही अवस्था चिंताजनक बनली आहे. साकव कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
– मार्गाचा वापर दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक करत असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
– ग्रामपंचायतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात सद्यास्थितीत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
Comments are closed.