नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा, निकाल ऐकताच पीडितेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर

नसरापूर प्रकरणाचा अंतिम निकाल पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या खटल्यात आज (सोमवार, 29 जून) ऐतिहासिक निकाल लागला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी 65 वर्षीय नराधम आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल ऐकताच न्यायालयात उपस्थित असलेल्या पीडितेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. हा खटला राज्यातील सर्वात जलदगतीने निकालात निघालेला पहिलाच खटला ठरला असून, गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांत आरोपीला फाशी सुनावण्यात आली आहे.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकाल वाचन करताना अत्यंत कडक शब्दांत आरोपीच्या कृत्याचा निषेध केला. “हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ या श्रेणीत मोडतो. आरोपीने दाखवलेली क्रूरता आणि चिमुरडीला दिलेला त्रास अमानुष होता. मुलीच्या अंगावर तब्बल 18 जखमा होत्या. मुलगी अत्यंत असहाय्य होती आणि स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी आरोपीने हे कृत्य केले,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. हत्येनंतरही त्याने तिच्यावर अत्याचार केला होता आणि तिला जिवंत राहण्याचा कोणताही पर्याय दिला नव्हता. त्यामुळे अशा नराधमाला वयाचा विचार करून माफी देण्यालायक काहीही नाही, असे न्यायालयाने म्हटले.

तपासादरम्यान समोर आले की, आरोपी भीमराव कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याचा गंभीर पूर्वइतिहास आहे. यापूर्वी 53 वर्षांचा असताना त्याने स्वतःच्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच एका वृद्ध महिलेवर हल्ला आणि दुसऱ्या एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचाही त्याने प्रयत्न केला होता. यावरून त्याला कायद्याची भीती नव्हती आणि त्याला कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप नव्हता, हे सिद्ध झाले.

Nasrapur Case Final Verdict:  पुणे ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

या संवेदनशील प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली. 1 मे 2026 रोजी ही घटना घडली होती, त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत सुमारे 1,200 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान एकूण 55 साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी या प्रकरणाचा सचोटीने पाठपुरावा केला आणि आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे 12 विविध निकाल दाखल केले. डॉक्टर, सायबर एक्स्पर्ट आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उत्कृष्ट टीमवर्कमुळे हे प्रकरण तडीस गेले.

Timeline of Nasrapur Case: नसरापूर प्रकरणाचा घटनाक्रम

  • 1 मे 2026 (संध्याकाळ) – नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. काही वेळानंतर मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय.
  • 2 मे 2026- पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले.
  • मे 2026 चा पहिला आठवडा – शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय, तपासणीचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले. तपासात घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले. याच काळात – नसरापूर, भोर आणि परिसरात नागरिकांनी निषेध आंदोलने केली. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तपासादरम्यान – पोलिसांनी आरोपीची घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. सीसीटीव्ही, ‘डीएनए’, साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले.
  • 16 मे 2026 – अवघ्या सुमारे 15 दिवसांत तपास पूर्ण करून विशेष न्यायालयात सुमारे 1 हजार 200 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
  • 28 मे – न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केले आणि खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली.
  • जून 2026 – सरकार पक्षाने साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. अनेक साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली.
  • 20 जून 2026 च्या सुमारास- दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद सुरू झाले. सरकार पक्षाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोर शिक्षेची मागणी केली.
  • 25 जून 2026 – न्यायालयाकडून निकाल जाहीर होण्याचे नियोजन करण्यात आले.
  • 29 जून 2026- आरोपी भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली.

आणखी वाचा

Pune Nasrapur Case Result: भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?

Comments are closed.