फडणवीसांना संघाचा पाठिंबा, पण ते स्पर्धेत येऊ नये म्हणून शहासेनेचे प्रयत्न; उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र

विदर्भ-मराठवाड्यातील गद्दार खासदारांच्या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसात जोरदार मेळावे घेत शिवसेना अजूनही मजबूत आहे, निष्ठावंत शिवसैनिक अजिबात हललेला नाही, तर त्याच्या मनात गद्दारांविषयी प्रचंड रोष आहे हे समोर दाखवून दिले. यानंतर सोमवारी शिर्डी येथे निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्याला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटतेय, ते पंतप्रधान पदाचा एक चांगला चेहरा आहेत, त्यांना संघाचा देखील पाठिंबा आहे. पण ते स्पर्धेत येऊ नये म्हणून शहासेना कदाचित सुपारी घेऊन पक्ष फोडाफोडीचे काम करत आहे’, अशी शक्यता व्यक्त केली.

सहा खासदार सोडून गेले त्याआधी केंद्र सरकारकडून बिल पास करण्यासाठी काही समन्वय साधण्यात आला होता का या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले. नाही.. आमचं म्हणणं आजदेखील हेच आहे कोणतंही विधेयक आणताना आम्ही विरोधी पक्ष आहोत असं म्हणणं थांबवलं पाहिजे. आम्ही तुमच्यासोबत सत्ताधारी पक्षात होतो.. जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार जनतेने आणि घटनेने आम्हाला दिला आहे. तुम्ही कोणतंही विधेयक मांडण्यापूर्वी देशातील प्रमुख पक्षनेत्यांना बोलवा संसदेतील गटनेत्यांना बोलवा आणि तुम्ही समजवून सांगा आमच्या काही सूचना असतील आमचे काही आक्षेप असतील त्याचा विचार करायला हवा.. तुम्ही सत्तेत आज आहात उद्या आम्ही असू.. तेव्हा आपल्या सर्वांसमोर देशहित हे महत्त्वाचं असलं पाहिजे.

शरद पवारांनी मोदी शहा केंद्राशी चांगले संबंध ठेवले आहे या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, कसं आहे त्यांना जे जमतं ते सगळंच मला जमतं असं नाही.. शरद पवारांनी मोदी शहा यांच्याशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत.. मी शहासेनेबद्दल काही बोलू शकत नाही.. बोलू इच्छित नाही.. ते बोलण्याच्या लायकीचे नाही असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच पंतप्रधानपदापदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या चर्चेबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील माणूस पंतप्रधानापदाचं स्वप्न पाहात असेल तर त्याला काहीच हरकत नाही. नितीन गडकरींचं नाव तसं घेतलं जात होतं.. नितीन गडकरींनाना संघाचा पाठिंबा होता. त्यावेळी त्यांना कारण नसताना बदनाम करण्यात आलं होतं. देवेंद्र फडणवीस यांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या ऐकण्यात आलं.. संघाचा पाठिंबा असलेला माणूस रेसमध्ये येऊच नये… अशी शक्यता नाकारता येत नाही..

मी चेष्टा मस्करी करत नाही पण मला मला देवेंद्र फडणविसांच्या करिअरची काळजी वाटतेय.. मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्यात चूक काय.. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी यावेळी नरसिंहराव यांच्या पंतप्रधानपदावेळची आठवण सांगितली. नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले त्याच्या आधी ते महाराष्ट्रातून निवडणूक लढवायचे.. रामटेकवरून निवडणूक लढवायचे. परंतु ते जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळी ते खासदार नव्हते.. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते आंध्रप्रदेशातील नंद्यालमध्ये गेले. त्यावेळी एनटीरामाराव हे कट्टर काॅंग्रेस विरोधक हे मुख्यमंत्री होते.. त्यांनी भूमिका अशी घेतली माझ्या आंध्राचा माणूस प्रथम पंतप्रधान होतोय मी त्याच्याविरूद्ध लढणार नाही.. जवळपास साडेपाच लाखाच्या मताधिक्याने नरसिंहराव विजयी झाले होते. जर इतर राज्य इतर प्रांत त्यांच्या अस्मितेचा अभिमान बाळगत असेल तर महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान का बाळगू नये. आपल्या अस्मितेवर अशा फोडाफोडीने घाला घालण्यात येत असेल तर मग मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्राने एकवटलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार हे त्यांनी जाहीर केल्यास आम्ही नक्कीच पाठिंबा देऊ.. महाराष्ट्राचा मराठी माणूस पंतप्रधान व्हावा गद्दार सोडून…

लोकसभेतील विधेयकासंदर्भातील प्रश्नावर, उद्धव ठाकरे म्हणाले, बघा एकूणच तुम्ही म्हणताय तोच विषय आहे.. गेल्या वेळी ते विधेयक फेटाळलं गेलं.. भारतीय जनता पक्षाकडे तेवढे खासदार नाही आहेत. जेवढे खासदार त्यांनी घेतले आहेत त्यातले दोन तृतियांश खासदार इतर पक्षातून घेतलं… विधेयक मंजूर करायला दोन तृतियांश बहुमत लागतं.. ते नाही आहे.. म्हणून मग शिवसेना फोड, तृणमूल फोड आप फोड.. हे फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे.. याबद्दल मी असं म्हणतोय नेमकं विधेयकाला महिला आरक्षणाचा मुलामा लावण्याची गरज नव्हती.. महिला आरक्षण पाहिजेच ते या क्षणापासून पाहिजे.. आता पहिल्यांदी साडेपाचशेच्या आसपास जे खासदार आहेत त्याच्यामध्ये पहिलं महिला आरक्षण लागू करा.. आणि मग आपण 800 साडेआठशे जसे खासदार होतील त्यांची टक्केवारी तशी होईल.. पण डिलिमिटेशन करताना तुम्ही जो काही क्रायटेरिया लावताय त्याच्याबद्दल देशातील प्रमुख पक्षातील नेत्यांना एकत्र बोलवून काय होणारे हे सांगायला हवं.. शेवटी हा विषय उत्तर आणि दक्षिण राज्य असा विषय नाही.. हा संपूर्ण देशाचा विषय आहे. त्यामुळे देशाचं मत विचारात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. केवळ फोडाफोडी करून दोन तृतियांश झाले आणि उद्या समजा आपण म्हणताय, उत्तरेचं प्राबल्य राहिलं आणि मग इतर राज्यांनी असं म्हटलं की आम्हाला मोदी नको मोदीसुद्धा बाहेरचे आहेत.. मग काय कराल? तर त्याच्यासाठी सर्वांनी नीट विचारविनिमय करायला पाहिजे.. आणि मग आपण निर्णय घेऊ ना.. देशहिताचा जो निर्णय असेल त्याच्यासोबत आम्ही आणि सर्व पक्ष राहणार आहेतच..

आमच्या पक्षातून जे गद्दार गेलेत त्यांच्या गद्दारीला कंटाळून गेलेले लोक परत आलेत…पक्ष आणि शिवसेनेवर दरवेळेला असं काही कोणी आघात करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी अधिक जोमाने उसळून वरती येतो. तुम्ही बघितलं असाल माझं सरकार पाडलं गद्दारी करून 40 आमदार फोडलेले त्याच्यानंतरच्या निवडणुकीत नवीन निशाणी 15 दिवस आधी मिळाली होती. बाळासाहेबांचा चेहरा हा त्यांनी चोरला होता त्यामुळे संभ्रम झाला.. पण त्यांना मी असं म्हणेन तो बिनबापाचा पक्ष आहे. त्यांना बाप शोधावा लागतो बाप बदलावा लागतो. एक दिल्लीत एक इकडे एक तिकडे..असे फोटो त्यांना वेगवेगळे वापरावे लागतात. मी माझ्या वडिलांच्या फोटोच्या आधारावरती नवीन निशाणी घेऊन निवडणूक लढवली आणि नऊ खासदार शिवसेनेचे निवडून आले.

आता जर का देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान पदासाठी तयारी करताहेत हे सांगितलं तर मग ते राहतील का पक्षात… ते जेव्हा जाहीर करतील उमेदवारी त्यावेळी राहू त्यांच्यासोबत.. महाराष्ट्राचा माणूस जर पंतप्रधानपदी बसणार असेल तर.. शिवसेना सोबत का नको राहायला …पण गद्दार होत असेल तर मात्र सोबत जाणार नाही..

मी तुम्हाला उदाहरणासकट सांगतोय फडणवीसांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची सुद्धा धोक्यात येऊ शकते. कारण तुम्ही बघितलं असेल एक नितीन गडकरीचं उदाहरण दिलं.. दुसरं मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांचं उदाहरण दिलं.. तिकडे परिस्थिती कठीण असताना सुद्धा शिवराज मामा लोकं आपणहून म्हणत होते.. आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे मध्यप्रदेशात भाजप अनपेक्षितपणे जिंकलं होतं. त्यांना असं वाटायला लागलं होतं की उद्या शिवराज मामा भाजप अध्यक्ष बनू शकतात. उद्या शिवराज मामा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतात.. त्याच्यामुळे त्यांना वरती घेतलं.. आणि आज शिवराज सिंह यांचं नावही नाही..

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणं हा भाजपला धोका आहे. त्यामुळे संघाने ठरवायला पाहिजे.. पूर्वी असं मानलं जात होतं की संघ ठरवेल तो भाजपचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होतो. आता संघाची तेवढी पकड ही त्यांच्यावर राहिली की नाही हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे फोडाफोडीचे गद्दारीचं राजकारण संघाला मान्य आहे का? हा सुद्धा एक प्रश्न आहे.

देवेद्र फडणवीस आणि आम्ही दोन कोपऱ्यात झाल्यामुळे मधल्या मध्ये सर्व गोंधळ घालताहेत.. त्यांना असं वाटत असेल मी त्यांचा शत्रू आहे पण मी त्यांचा हितचिंतक आहे.. म्हणून मी ही गोष्ट त्यांच्या मन की बातमधली करतोय. त्यांच्याकडे उपरवालेकी मर्जी आहे.. ठाकरे कुटुंबाला एक परंपरा आहे, मी मागे आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगितलं होतं.. आमच्या पाच सहा पिढ्या जनतेसमोर आहे. यांना तर आधी वडिलांचा पत्ता नाही.. पोराला खासदार केलं मंत्री करायचं आहे.. पण ठाकरे कुटूंबाने काही घ्यायचं नाही त्यामुळे आदित्यला टारगेट करताहेत. त्यांच्या घराण्याला ठाकरे घराण्यानेच आधार दिलाय..

राधाकृष्ण विखे पाटील यांचा नेमका आत्मा कुठेय? त्यांचा आत्मा आज भाजपमध्ये आहे काल आमच्याकडे होता त्याआधी काॅंग्रेसमध्ये होता.. त्यांनी आत्मनियंत्रण करावे कारण त्यांचा आत्माराम कुठे कुठे फिरतोय… पक्षसंघटनेत भाजपने बदल जरूर केले पाहिजेत. त्यांनी त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे.. उपऱ्यांना गद्दारांना डोक्यावर ठेवू नये. भाजप उभे करण्यासाठी कार्यकर्ते राबले घरादारावर निखारे ठेवले असे भाजपचे कार्यकर्ते सध्या उपरे- गद्दारांच्या चटाया उचलताहेत. केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होण्यासंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले, लायकी नसली तरी आपलं कार्ट मंत्री झालं पाहिजे अशी शहासेनेच्या प्रमुखाची इच्छा आहे. त्यामुळे शहा जाणे आणि ते जाणे.. देवेंद्र जाणे आणि भाजप जाणे असे म्हणत मिंध्याचा खरपूस समाचार घेतला.

Comments are closed.