पोलीस-भूमिपुत्रांत धुमश्चक्री, बंदराच्या पाहणीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना भेटूच दिले नाही; फडणवीसांसमोर सरकारविरोधात जोरदार घोषणा

हजारो भूमिपुत्रांचा विरोध डावलून राज्य व केंद्र सरकार वाढवण बंदर लादत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बंदर विकासमंत्री नीतेश राणे हे प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी आक्रमक झालेल्या बंदरविरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी भेटूच दिले नाही. त्यामुळे संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी रद्द करा.. विनाशकारी वाढवण बंदर रद्द करा अशा गगनभेदी घोषणा दिल्या. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. एवढेच नव्हे तर वाढवणमध्ये पोलीस व भूमिपुत्रांमध्ये धुमश्चक्री झाली. फडणवीसांच्या समोरच सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्याने वातावरण अधिकच चिघळले. सरकारने कितीही दबाव टाकला तरी आमचा वाढवण बंदराला विरोध कायमच असेल, अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे.

वाढवण बंदराविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून भूमिपुत्र संघर्ष करत आहेत. या बंदरासाठी जबरदस्तीने जागा लाटण्यात आल्या असून बंदरामुळे मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहेत. त्याशिवाय जैवविविधतादेखील नष्ट होईल, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तरीदेखील विनाशकारी वाढवण बंदर उभारण्याचा आटापिटा सरकार करत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिकारी व अन्य लवाजम्यासह दुपारी एकच्या सुमारास वाढवण बंदरापासून सहा किमी अंतरावर असलेल्या चिंचणी येथे कामाच्या पाहणीसाठी आले.

वाढवण बंदराच्या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री येणार म्हणून डहाणू, चिंचणी, बोईसर, वाढवण, वरोर येथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वाढवण बंदरासाठी भूसंपादन करताना स्थानिकांना विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पण प्रत्यक्षात मात्र संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी बळावर त्यांना हाकलून लावले.

७२ हजार झाडे तोडणार

वाढवण बंदर उभारण्यासाठी परिसरातील तब्बल ७२ हजार झाडे तोडावी लागणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून २०८ खारफुटीची झाडेदेखील तोडण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे. मोठे वृक्ष तोडण्याचे काम वृक्ष प्राधिकरणाकडे सोपवले असून याबाबत संघर्ष समितीने तीव्र आक्षेप घेतला आहे. या बंदरामुळे केवळ मच्छीमारच नव्हे तर शेतकरी आणि लहान उद्योजकही उद्ध्वस्त होणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.

पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांना प्रत्यक्ष भेटून आपली भूमिका व समस्या मांडण्यासाठी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे प्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर वरोर येथे जमले होते. पण देवेंद्र फडणवीस हे अचानक चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर बंदर स्थळाची पाहणी करण्यासाठी गेल्याचे समजले. त्यामुळे सर्व कार्यकर्ते चिंचणी कॉलेज रोडवर एकत्र आले. प्रचंड पोलीस बंदोबस्तात मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच त्यांना भेटण्याचा कार्यकर्त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी तर पोलिसांचे कडेही तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

निवडणुकीची माहिती पटकन बदलते. अधिकृत स्त्रोतांसह प्रतिसादांची पडताळणी करा.

बोलणे

Comments are closed.