लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ

नाशिक महानगरपालिका: नाशिक महापालिकेच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि लोकशाहीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लोकशाहीच्या पवित्र मंदिरातच लोकप्रतिनिधींनी लोकशाहीचे ओंगळवाणे दर्शन घडवलं. नवीन नाशिक प्रभाग समितीच्या अधिकृत बैठकीत भाजपचे नगरसेवक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) आणि अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, या दोन्ही नगरसेवकांनी भर सभागृहात एकमेकांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

या दोन्ही बड्या नगरसेवकांमध्ये झालेल्या या हायव्होल्टेज राड्यामुळे महापालिका प्रशासनात आणि नाशिकच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीच्या काळातील जुना वाद अजूनही धुमसत असल्याचं या गंभीर आणि लाजिरवाण्या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

Nashik Prabhag Samiti Controversy : दूषित पाण्याच्या प्रश्नावरून वादाची ठिणगी

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन नाशिक प्रभाग समितीची बैठक सुरू होती. यावेळी सिडको परिसरातील दूषित पाण्याच्या गंभीर प्रश्नांवरून काही महिला नगरसेविका सभापती बाळकृष्ण शिरसाट यांना निवेदन देत होत्या. महिला नगरसेविका निवेदन देत असताना, सभापतींनी उभे न राहता खुर्चीवर बसूनच निवेदन स्वीकारावे, असा सल्ला अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सभापतींना दिला. त्यावेळी शहाणे यांनी दिलेल्या या सल्ल्यावरून तिथे उपस्थित असलेले भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यात आधी शाब्दिक चकमक सुरू झाली.

Sudhakar Badgujar VS Mukesh Shahane : महिलांसमोरच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

दोन्ही नेत्यांमधील हा शाब्दिक वाद काही वेळातच अत्यंत विकोपाला गेला. वादाचे पर्यवसान थेट गंभीर वैयक्तिक आरोपांमध्ये आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यामध्ये झाले. सभागृहात अनेक महिला नगरसेविका आणि अधिकारी उपस्थित होते, तसेच अधिकृत सभा सुरू होती, याचे कोणतेही भान या दोन्ही नगरसेवकांना राहिले नाही. आपण जनतेचे प्रतिनिधित्व करणारे लोकसेवक आहोत, याचे भान विसरून दोन्ही लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर शब्दांचे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन प्रहार केले.

नाशिक NMC Corporators Apology : घटनेनंतर सभागृहात व्यक्त केली दिलगिरी

या धक्कादायक प्रकारामुळे काही काळ प्रभाग समितीच्या बैठकीतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. भर सभागृहात झालेल्या या राड्यानंतर आणि इतर सदस्यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण थोडे शांत झाले.

या ओंगळवाण्या प्रकारानंतर भानावर आलेल्या दोन्ही नगरसेवकांनी, म्हणजेच सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांनी सभागृहाची आणि उपस्थित सदस्यांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली. मात्र, या घटनेचा व्हिडीओ आणि वृत्त समोर आल्यानंतर नाशिककरांमधून या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या वर्तणुकीवर तीव्र संताप आणि निषेध व्यक्त केला जात आहे.

ही बातमी वाचा:

Comments are closed.