बोगस पदवीने नोकरी मिळवणाऱ्या पालिका अभियंत्याचे निलंबन, शिवसेनेच्या पाठपुराव्याला मोठे यश
बोगस इंजिनीयरिंग पदवीने महापालिकेची तब्बल 14 वर्षे नोकरी करणाऱ्या दुय्यम अभियंत्याला पालिकेने अखेर निलंबित केले आहे. या प्रकरणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी बोगस पदवीचा गंभीर प्रकार समोर आणत कारवाईसाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. याबाबत दैनिक ‘सामना’मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते.
दुय्यम अभियंता (स्थापत्य) धर्मराज दावणे याची नोव्हेंबर 2011 मध्ये नियुक्ती झाली होती. मात्र त्याने यावेळी पालिकेला बोगस इंजिनीयरिंग पदवी सादर केली होती. त्याच्या शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रावर बीई सिव्हिल म्हणून नोंद आहे. मात्र ही पदवी बोगस असल्याचे समोर आले होते. याबाबत शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. संबंधित अधिकाऱयाविरोधात गुन्हा दाखल करा, सेवेतून बडतर्फ आणि भरती प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱयांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती. या लक्षवेधी सूचनेला शासनाने दिलेल्या उत्तरानुसार, संबंधित दुय्यम अभियंत्याने 20 मार्च रोजी ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीयर्स, नवी दिल्ली’ या खासगी संस्थेचे अभियांत्रिकी पदवीचे प्रमाणपत्र पालिकेच्या प्रशासनास सादर केले. मात्र, सदर संस्था अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन किंवा भारत सरकार मान्यताप्राप्त अभियांत्रिकी विद्यापीठ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या संस्थेचे प्रमाणपत्र पालिकेच्या भरती जाहिरातीतील शैक्षणिक पात्रतेच्या अटींची पूर्तता करीत नसल्याची माहितीही समोर आली. त्यामुळे 4 जून रोजीच्या मंजुरीने खात्यांतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत तत्काळ प्रभावाने धर्मराज दावणे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नसून संबंधित अधिकाऱयाविरोधात गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे तसेच भरती प्रक्रियेत सहभागी सर्व दोषी अधिकारी व कर्मचाऱयांवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे.
Comments are closed.