इटावामध्ये मंदिर बांधल्यानंतर अयोध्येला जाणार.
अखिलेश यादव यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ लखनौ
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे अद्याप अयोध्येतील राम मंदिरात न गेल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. आता अखिलेश यांनी या मुद्द्यावर स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे. इटावामध्ये आम्ही केदारेश्वर शिव मंदिर निर्माण करत आहोत, त्याचे काम पूर्ण होताच मी राम मंदिरात दर्शनासाठी परिवारासोबत जाणार असल्याचे अखिलेश यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अनेकदा अयोध्येला गेले, परंतु तेथे काय घडतंय याचीच कल्पना त्यांनी नव्हती. भाजपची नजर नेशनवर नव्हे तर डोनेशनवर आहे. भाजप चंदा, चोरी, चतुराई आणि चलाखी या 4 सी वर काम करत असल्याची टीका अखिलेश यांनी केली आहे. 2027 मध्ये पीडीए (मागास, दलित, अल्पसंख्याक) आघाडीसोबत सपचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
तर दुसरीकडे उत्तरप्रदेशमधील काँग्रेस नेते शरद शुक्ला यांनी राम मंदिरातील दान चोरीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट भंग करण्यात यावे आणि त्याची सर्वांना स्वीकारार्ह ठरेल अशी पुनर्रचना करण्यात यावी अशी मागणी शुक्ला यांनी पत्रात केली आहे.
Comments are closed.