आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ जाहीर, टी 20 वर्ल्डकपमधील पराभवानंतर संघात दोन बदल!

नुकतेच भारतीय महिला क्रिकेट संघ टी २० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात अयपशी ठरला. वनडे विश्वचषक विजयाची पुनरावृत्ती करण्यात महिला संघ अपयशी ठरल्याने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या संघातील स्थानाविषयी चर्चा सुरू झाली होती. मंगळवारी (३० जून) महिला निवड समितीने या अनुभवी खेळाडूला अंत्यत महत्त्वाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (एशियन गेम्स) महिला संघाची कर्णधार म्हणून कायम ठेवल्याने सर्व चर्चांना एकप्रकारे पूर्णविराम दिला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ सप्टेंबरमध्ये जपामधील ऐची-नागोया येथे होणार आहे. चीनमधील हांगझू येथे झालेल्या मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे, भारतीय महिला संघ गतविजेता म्हणून या स्पर्धेत उतरेल.

स्मृती मानधना उपकर्णधार असून श्रेयांका पाटीललाही संघात स्थान देण्यात आले आहे. तिचा सहभाग मात्र फिटनेसच्या मंजुरीवर अवलंबून असेल. तसेच टी२० विश्वचषकाचा भाग असलेले विकेटकीपर-फलंदाज यास्तिका भाटिया आणि प्रेमा रावत यांना आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातून वगळले आहे.

हरमनप्रीतने टी२० विश्वचषक २०२६ मध्ये खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांत १४१ धावा केल्या होत्या. यामध्ये तिने सर्वोत्तम कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ गटातील अंतिम सामन्यात केली. त्या सामन्यात तिने ५६ धावा केल्या होत्या, मात्र भारताने हा सामना गमावला आणि ते स्पर्धेबाहेर झाले.

२०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), भारती फुलमाली, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकुर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील*, राधा यादव आणि नंदनी शर्मा.

(*फिटनेसच्या मंजुरीवर अवलंबून)

Comments are closed.