Ratnagiri News – वाटद-खंडाळाचे प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी, कोणत्याहीक्षणी स्लॅब कोसळण्याचा धोका; शिवसेनेचं निवेदन
रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या ४० वर्षात या इमारतीची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे कोणत्याही क्षणी स्लॅब कोसळण्याची शक्यता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांनी आज (30 जून 2026) रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जयगड परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. त्यामुळे परिसरात अपघात वाढत आहेत. अशावेळी चांगल्या आरोग्य सुविधांची गरज भासत आहे. वादट-खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दरदिवशी १५० हून अधिक रुग्ण उपचारांसाठी येतात. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था बिकट आहे. आरोग्य केंद्रातील स्लॅब कधीही कोसळू शकतो. इमारतीचे खांब धोकादायक स्थितीत आहेत. भिंतीतून पाण्याची गळती सुरू आहे. विद्युत वाहिनीत पाणी शिरत असल्याने वीजेचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता आहे.
कर्मचारी वर्गाला वीजेचा धक्का बसण्याचे अनुभव आले आहेत. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी पदे रिक्त आहेत. दोन कंत्राटी डॉक्टर सेवा बजावत आहेत. सोनोग्राफी आणि एक्स-रे सारख्या सुविधा नसल्यानेच प्रथमेश गावणकर यांनी निवेदनात म्हटले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांना दालनात बोलावून यासर्व तक्रारींवर गांभीर्याने कारवाई करण्याची सूचना केली.
Comments are closed.