पावसाळ्यात ओले केस सुकवताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या

पावसाळ्यात वातावरणामध्ये आधीच खूप दमटपणा असतो, ज्यामुळे केस जास्त काळ ओले राहतात. त्यात जर तुम्ही भिजले असाल तर अशा वेळी केस सुकवण्यासाठी आपण नकळत काही चुका करतो, ज्यामुळे केसांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. आज आपण पावसाळ्यात ओल्या केसांवर कोणत्या गोष्टींचा वापर करू शकतो याबद्दल जाणून घेऊयात.

हेअर स्ट्रेटनर किंवा कर्लर

केस ओले असताना हेअर स्ट्रेटनर, कर्लर किंवा अति गरम ब्लो ड्रायर वापरणे ही सर्वात मोठी चूक आहे. ओले केस नाजूक असतात. त्यावर थेट उष्णता दिल्यास केसांमधील नैसर्गिक ओलावा नष्ट होतो, केस कोरडे होतात आणि दुभंगू शकतात.

जाड आणि जड सुती टॉवेल

ओले केस सुकवण्यासाठी आपण बऱ्याचदा जड टॉवेल डोक्याला घट्ट बांधून ठेवतो किंवा त्याने केस जोरात घासतो. परंतू, असे केल्याने केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळती वाढते. अशावेळी टॉवेलऐवजी मायक्रोफायबर टॉवेल (Microfiber Towel) किंवा जुन्या सुती टी-शर्टचा वापर करावा.

रासायनिक केस उत्पादने

केस ओले असताना त्यावर अतिप्रमाणात हेअर जेल, वॅक्स किंवा केमिकलयुक्त जड सिरम लावणे टाळा. दमट हवेमुळे हे प्रॉडक्ट्स केसांमध्ये चिकटून राहतात, ज्यामुळे टाळूवर घाण जमा होते आणि कोंडा होऊ शकतो.

बारीक दातांचा कंगवा

केस ओले असताना ते जास्त लवचिक आणि नाजूक असतात. अशा वेळी बारीक दातांचा कंगवा वापरल्यास केस खूप जास्त प्रमाणात तुटतात.अशावेळी केस थोडे सुकू द्या, त्यानंतर मोठ्या दातांच्या लाकडी कंगव्याने खालून सुरुवात करत हळूहळू जटा काढाव्यात.

हेही वाचा –Makeup Hacks : परफेक्ट क्रीम ब्लश लावण्यासाठी खास ट्रिक्स

Comments are closed.