दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होणार? ‘त्या’ चर्चांवर वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य; म्ह

दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अर्थमंत्री पदावरून (Finance Minister Post) पुन्हा एकदा जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. हे महत्त्वाचे पद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडे येणार असल्याचे बोलले जात असून, यासाठी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले असता माध्यमांशी संवाद साधला. “मी अर्थमंत्री होणार, ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये सुरू असून याबाबतचा अंतिम निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी योग्य वेळी घेतील,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वतःकडे ठेवले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिले जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपूनही अर्थ खाते अजूनही मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने अजित पवार गटातून या पदासाठी जोरदार मागणी केली जात आहे. यातूनच दिलीप वळसे पाटील हे राज्याचे नवीन अर्थमंत्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

या चर्चेवर बोलताना वळसे पाटील म्हणाले, “अर्थमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठी संबंधितांशी बोलत असतील तर मला माहित नाही, मात्र ज्यावेळी त्याचा निर्णय होईल तेव्हा तो सर्वांनाच कळेल. राजकारणात उद्या नेमके काय घडेल हे कधीच आधी सांगता येत नसते. त्यामुळे थोडी वाट पाहू आणि चांगलेच ऐकायला मिळेल,” असे सूचक संकेतही त्यांनी यावेळी दिले.

Dilip Walse Patil: दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार? वळसे पाटलांचे मोठे संकेत

शरद पवार गट आणि अजित पवार गट म्हणजेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेवरही त्यांनी अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले. “अजून मतदारसंघ पुनर्रचनेचे काम व्हायचे आहे आणि मतदार नोंदणीचे कामही सुरू झाले आहे. अशा घडामोडी एका रात्रीत घडत नसतात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याबाबत दोन्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील. त्यांचा निर्णय झाल्यावर तो सर्वांनाच कळेल,” असे सांगत त्यांनी पडद्यामागे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आणण्याबाबत काही हालचाली सुरू असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले. तसेच केंद्र सरकार पुन्हा एकदा मतदारसंघ रचनेबाबत विधेयक आणण्याच्या तयारीत असून हे होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Dilip Walse Patil: 2029 ला महायुती एकत्र लढणार का?

आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत महायुती (Mahayuti) एकत्र सामोरी जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, “हे आताच सांगता येत नसले तरी तशी काही अडचण नाही. मात्र, याचा अंतिम निर्णय महायुतीमधील तीनही पक्षांच्या प्रमुखांना मिळून घ्यावा लागेल, हा निर्णय कोणताही एक पक्ष किंवा नेता एकट्याने घेऊ शकत नाही,” असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

NCP Crisis: ठाकरे गटानंतर आता शरद पवारांच्या पक्षात राजकीय भूकंपाचे संकेत, दोन गट पडल्याने टेन्शन वाढलं

Comments are closed.