बीड जिल्हा वेटिंगवरच; फक्त रिमझिम, शेतकऱ्यांमध्ये घालमेल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर पाहण्यास मिळत असताना, यंदा पावसाने बीड जिल्ह्याला वेटिंगवर ठेवले आहे. पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला, तरी केवळ एखादी दुसरी सरी आणि कधीतरी रिमझिम पाऊस पडत आहे. बहुतांश वेळा फक्त आभाळ भरून येते. पाऊस रुसल्यामुळे पेरणी झालेला आणि पेरणी न झालेला, अशा दोन्ही शेतकऱ्यांमध्ये मोठी घालमेल पाहण्यास मिळत आहे.

एकीकडे राज्यातील काही भागांत रेड अलर्ट, तर कुठे येलो अलर्ट दिला जात आहे. तिथे पावसाचा हाहाकार दिसत असताना, दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यात यंदा पाऊस रुसला की काय, असे वाटू लागले आहे. पावसाळ्याचा महिना उलटला, तरी सर्वत्र सारखा पाऊस एकदाही झाला नाही. कधीतरी एखादी दुसरी सरी येते, रस्ता ओला करून जाते; तर सायंकाळच्या वेळेस कधीतरी रिमझिम पावसाची हजेरी असते. यंदा पावसाने बीड जिल्ह्याला वेटिंगवर ठेवले आहे. गेल्या चोवीस तासांत बीड ३.५, पाटोदा ०, आष्टी ०.५, गेवराई ७.४, माजलगाव ९.४, अंबाजोगाई ४.९, केज ०.४, परळी ११.९, धारूर १६, वडवणी ५.९, आणि शिरूर १.९ असा एकूण ४.९ मि.मी.च्या सरासरीने पाऊस झाला आहे.

पावसात जोर नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी घालमेल सुरू आहे. थोड्याशा पावसाच्या भरोशावर कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची पेरणी झाली आहे. खरीप हंगामातील या पिकांना आता मोठ्या पावसाची गरज आहे. तर दुसरीकडे, पाऊस जोर धरत नसल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे धाडस केले नाही. खरीप हंगामातील पेरणीला आता उशीर होऊ लागल्याने त्यांचीही घालमेल होत आहे.

Comments are closed.