वैभवचा ऐतिहासिक डेब्यू फिका! कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर पुन्हा नापास, आयर्लंडनंतर इंग्लंडने भा

भारताचा इंग्लंडकडून दुसरा T20 4 गडी राखून पराभव आधी आयर्लंडविरुद्धचा 0-2 असा मालिका पराभव आणि आता इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करत इतिहास रचला. मात्र, त्याचा हा खास क्षण विजयाने साजरा करता आला नाही. भारताने इंग्लंडसमोर 191 धावांचे आव्हान उभे केले होते, पण इंग्लंडने दमदार फलंदाजी करत 19 व्या षटकातच 4 विकेट्स राखून लक्ष्य गाठले आणि मालिकेत आपले वर्चस्व कायम राखले.

वैभव सूर्यवंशीचे पदार्पण, तिलकचा तुफानी फिनिश

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला 15 वर्षीय पदार्पणवीर वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 4.5 षटकांत 50 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर विल जॅक्सने वैभवला बाद करत ही भागीदारी मोडली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच सामन्यात वैभवने 10 चेंडूत 14 धावा करत 2 शानदार षटकार ठोकले. त्यानंतर अभिषेक शर्मानेही आक्रमक फलंदाजी करत 24 चेंडूत 43 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. अखेर सॅम करनने त्याला बाद केले.

यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 65 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी उभारली. मात्र, लियाम डॉसनने श्रेयसला बाद करत ही जोडी फोडली. श्रेयसने 22 चेंडूत 37 धावा करत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. दुसरीकडे शिवम दुबेची बॅट शांत राहिली. तो 7 चेंडूत केवळ 5 धावा करून सॅम करनचा बळी ठरला. ईशान किशन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. सॅम करननेच त्याला 40 चेंडूत 49 धावांवर माघारी धाडले. ईशानच्या खेळीत 6 चौकारांचा समावेश होता. त्यानंतर अक्षर पटेल अवघ्या 2 धावांवर धावबाद झाला. अखेरच्या षटकांत तिलक वर्माने धडाकेबाज फलंदाजी करत भारताची धावसंख्या 190 पर्यंत पोहोचवली. तिलकने अवघ्या 11 चेंडूत नाबाद 24 धावा करत 1 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी केली.

दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद

भारताने दिलेल्या 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर, फिल सॉल्ट आणि जोस बटलर यांना बाद केले. त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टला बाद केले. त्यानंतर त्याने पाचव्या चेंडूवर जोस बटलरला बाद केले. सॉल्ट आणि बटलर दोघेही आपले खाते उघडण्यात अपयशी ठरले. त्यानंतर कर्णधार हॅरी ब्रूक आणि जेकब बेथेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 49 धावा जोडून डाव सावरला.

कर्णधार हॅरी ब्रूक आणि टॉम बँटन यांनीही प्रत्येकी 39 धावा केल्या. शेवटी, इंग्लंडकडून जेकब बेथेलने 46 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांसह 76 धावांची नाबाद, सामना जिंकून देणारी खेळी केली. इंग्लंडने केवळ सहा गडी गमावून 19 षटकांत सहजपणे लक्ष्य गाठले. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन बळी घेतले, तर हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

हे ही वाचा –

Ind vs Eng 2nd T20 : संजू सॅमसन संघातून डच्चू, कोपऱ्यात तोंड पाडून उभा होता, तितक्यात मागून गौतम गंभीर आला अन्… कॅमेऱ्यासमोर नेमकं काय घडलं? पाहा Video

Comments are closed.