संजू सॅमसन संघातून डच्चू, कोपऱ्यात तोंड पाडून उभा होता, तितक्यात मागून गौतम गंभीर आला अन्… कॅ

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरी T20I : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणामुळे अनुभवी खेळाडू संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागले. आयर्लंड दौऱ्यापासूनच संजूच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या, तर दुसरीकडे वैभव जबरदस्त फॉर्मात असल्याने त्याला संघात स्थान मिळणे स्वाभाविक होते. मात्र, मँचेस्टर येथे टॉस झाल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संजू सॅमसनला ज्या प्रकारे धीर दिला, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गौतम गंभीरने मारली संजूला मिठी

एकीकडे चाहत्यांना वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाचा आनंद आहे, तर दुसरीकडे संजू सॅमसनला बाहेर बसवल्याचे दुःखही आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये संजूने लागोपाठ 97, 89 आणि 89 धावांच्या मॅच-विनिंग खेळी खेळून भारताला विश्वविजेता बनवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. गौतम गंभीरला संजूच्या या क्षमतेची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच, टॉस झाल्यानंतर गंभीरने संजूला मिठी मारली आणि त्याच्याशी संवाद साधून त्याचा आत्मविश्वास वाढवला. दोघांमधील या 31 सेकंदांच्या भावनिक संवादाचा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

संजू सॅमसनचा खराब फॉर्म

संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले जाईल, याचे संकेत आधीच मिळाले होते. गेल्या 3 डावांत त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. आयर्लंडविरुद्ध पहिला सामना तो 5 चेंडूत फक्त 4 धावा करू शकला. तर दुसरा सामना खातेही उघडता आले नाही. इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात 7 चेंडूंचा सामना करून फक्त 1 धाव करून आऊट झाला. या खराब फॉर्ममुळे संघ व्यवस्थापनाला त्याला संघातून डच्चू देऊन फॉर्मात असलेल्या वैभव सूर्यवंशीला संधी देणे भाग पडले.

संजू सॅमसनसोबत नेहमीच होतो अन्याय?

संजू सॅमसनने 2015 मध्ये भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. परंतु, 11 वर्षांचा काळ उलटूनही त्याला संघात कायमस्वरूपी स्थान मिळवता आलेले नाही. जेव्हा जेव्हा संघातून एखाद्या खेळाडूला बाहेर काढण्याची वेळ येते, तेव्हा पहिली कुऱ्हाड संजूवरच कोसळते, अशी भावना चाहत्यांमध्ये आहे. यामुळेच 11 वर्षांच्या कारकिर्दीत तो केवळ 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला आहे.

वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली रन वैभव सूर्यवंशीनं तिसऱ्या बॉलवर केली. त्यानं जोश टंगच्या बॉलला स्केवअर लेगला मारत खातं उघडलं. वैभव सूर्यवंशीनं जोफ्रा आर्चरसारख्या दिग्गज गोलंदाजाला तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर षटकार मारला. यानंतर जोश टंगला देखील वैभव सूर्यवंशीनं षटकार मारला. आंतरराष्ट्रीय करिअरमधील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशी मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. वैभवनं दोन षटकार मारले. मात्र, विल जॅक्सच्या गोलंदाजीवर फटका मारण्यासाठी वैभवनं स्टेप आऊट केलं आणि याच वेळी जोस बटलरनं त्याला स्टम्पिंगद्वारे बाद केलं. वैभवनं 10 बॉलमध्ये 14 धावा केल्या.

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi 1st International Six : वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video

Comments are closed.