निवृत्तीनंतर क्रेनवर मिरवणूक
हरियाणा राज्यात सध्या एका कर्मचाऱ्याची ‘निवृत्ती’ चांगलीच गाजत आहे. तसे पाहिले तर, ही निवृत्ती अन्य कोणत्याही कर्मचाऱ्याची होते तशीच आहे. तथापि, ती ज्या प्रकारे साजरी करण्यात आली, तो प्रकार अद्भूत आहे. त्यामुळे सोशल मिडीयावरही त्याचा बोलबाला होत आहे. घटना अशी आहे, की या राज्यातील पानिपत येथील अन्न नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयातून महाबीर बांगड हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी 23 वर्षांच्या सेवेनंतर, वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेकांची निवृत्ती पाहिली होती. अत्यंत साधेपणाने त्यांचे अनेक सहकारी विशिष्ट वयानंतर निवृत्त झालेले होते. तथापि बांगर यांची इच्छा आपली निवृत्ती संस्मरणीय व्हावी अशी होती. ते यासाठी उपाय शोधत होते.
अखेर त्यांना एक अनोखी कल्पना सुचली. निवृत्तीच्या दिवशी त्यांनी कार्यालय परिसरात एक मोठा 100 फूट उंचीचा ‘हायड्रा व्रेन’ आणला. हा व्रेन रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी सजविला होता. निवृत्तीच्या दिवशी कार्यालयातील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा निरोप समारंभ साजरा केला. त्यानंतर, ते कार्यालयातून बाहेर येऊन या व्रेनवर चढले. त्यानंतर त्यांच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच बांगड यांचे कुटुंबिय आणि अन्य परिचित सहभागी झाले होते. अधिकारी वर्ग आपल्या थार, स्कॉर्पिओ आदी महागड्या गाड्यांमधून मिरवणुकीच्या अग्रभागी होता. त्यानंतर बांगड यांचा हा भला भोठा ‘व्रेन रथ’ होता. त्यात उभे राहून बांगड 100 फूट उंचीवरुन आपल्याच मिरवणुकीचे निरीक्षण करीत होते. आपली संकल्पना प्रत्यक्षात आणल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीही त्यांना या संकल्पनापूर्तीत मनापासून सहकार्य केल्याचे दिसले.
Comments are closed.