एआयने घोटाळा उघड केला.

सध्या ‘कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान’ किंवा ‘एआय’ची चर्चा सर्वच क्षेत्रांमध्ये आहे. हे तंत्रज्ञान कसे अतिशय उपयुक्त आहे आणि त्यामुळे कामाची प्रत कशी सुधारणार आहे, तसाच कामाचा वेग कसा वाढणार आहे, यासंबंधी मते व्यक्त केली जात आहेत. या तंत्रज्ञानाचा अतिरेकी उपयोग झाल्यास कोट्यावधी लोकांवर, विशेषत: नवशिक्या तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे, अशीही भाकिते केली जात आहे. तर, अनेकांच्या मते या तंत्रज्ञानाकडे पाठ न फिरवता ते कसे चांगल्या प्रकारे उपयोगात आणता येईल, हे पाहणे अधिक महत्वाचे आहे. या सर्व उलटसुलट मतांच्या पार्श्वभूमीवर त्याचा एक महत्वाचा उपयोग समोर आला आहे. या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने आर्थिक गुन्हे उघडकीस आणता येतात हे सिद्ध झाले.

छत्तीसगड राज्याच्या बस्तर जिल्ह्यात या तंत्रज्ञानाने साधारणत: 3 कोटी रुपयांचा ‘वेतन घोटाळा’ उघडकीस आणला आहे. या जिल्ह्याच्या पोलीस विभागात हा घोटाळा झाला असून तो तीन शिपायांनी (काँन्स्टेबल्स) केल्याचे दिसून येते, असे तपासकार्य करणाऱ्यांचे म्हणणे आहे. या तीन शिपायांनी एक शक्कल लढवून तीन वर्षांमध्ये वेतनाची 3 कोटी रुपयांचीं अतिरिक्त रक्कम उकळल्याचे उघड झाले. एआय आधारीत हिशेब तपासणीत या घोटाळ्याचा भांडाफोड झाला. या प्रकरणातला प्रमुख आरोपी डीएसएफ गिरीष रॉय हा वेतन काढण्यापूर्वी वेतन सूचीची सॉफ्ट कॉपी किंवा संगणकीय कॉपी मिळवत असे आणि स्वत: तसेच स्वत:च्या दोन सहकाऱ्यांच्या वेतनात बेकायदेशीररित्या वाढ सॉफ्ट कॉपीतील आकड्यांमध्ये घोटाळा करुन करत असे. अशा प्रकारे या कर्मचाऱ्यांनी कोणाच्याही लक्षात येऊ न देता तीन वर्षांमध्ये साधारणत: 3 कोटी रुपयांचे अतिरिक्त वेतन त्यांच्या नावे जमा केले. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे जेव्हा पोलीसांच्या वेतन खात्यांचा शोध घेण्यात आला, तेव्हा या कर्मचाऱ्यांच्या नावे त्यांच्या वेतनापेक्षा कितीतरी अधिक वेतन जमा झाल्याचे स्पष्ट झाले. या तंत्रज्ञानाने हे त्वरित करुन दाखविले, की जे मानवी हिशेब तपासनीसांनाही करता आले नव्हते. आता या तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर सादर करण्यात आला असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. एआयचा हा एक नवा उपयोग समोर आल्याने हिशेब तपासाचे काम वेगाने आणि अतियश अचूक होईल, असे दिसून येत आहे.

Comments are closed.