संस्कृतायन – आषाढच्या पहिल्या दिवशी.
>> डॉ समीरा गुजर जोशी
[email protected]
कालिदासाच्या साहित्याचे रसग्रहण मेघदूताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. प्रेमात झुरणारा यक्ष, त्याच्या अप्रतिम रचना आणि त्यातून त्याने केलेले निसर्गाचे अप्रतिम वर्णन याच्या प्रेमात आणि मोहात सगळेच काव्यरसिक आहेत. या काव्यात स्फुरलेन्या रचनेत सगळ्यात लोकप्रिय होण्याचा मान मिळाला आहे तो आषाढातील निसर्गाच्या वर्णनाला. आषाढातला पहिला दिवस निसर्गाला कवेत घेतच काव्यरसिकांना मोहिनी घालतो.
आषाढस्य प्रथम दिवसे…आषाढाच्या पहिल्या दिवसाला कालिदासाने साहित्य सृष्टीत अमर स्थान प्राप्त करून दिले. मागच्या लेखात आपण पाहिले त्याप्रमाणे एका श्लोकातूनही संपूर्ण व्यक्तिरेखा उभी करणे, प्रसंग रेखाटणे हे कालिदास लीलया करू शकतो. त्याचेच एक उदाहरण म्हणजे हा श्लोकही म्हणता येईल. आपण सोयीसाठी त्याचा शांताबाई शेळके यांनी केलेला सुंदर अनुवाद पाहू या.
गिरी वरी त्या महिने काही कंठीत राही तो विरही जन
सखीविरहे कृश असा जाहला गळे करातून सुवर्ण कंकण ।
आषाढाच्या पहिल्या दिवशी बघ तो शिखरी मेघ वाकला
टक्कर देण्या तट भिंतीवर क्रीडा तुरगज जणू ठाकला।
यक्ष प्रेमात झुरतो आहे याचं वर्णन किती मार्मिकपणे कालिदासाने केले आहे. ते हातातून गळून पडणारे सोन्याचे कडे लगेच आपल्या डोळ्यांसमोर विरहात झुरून बारीक झालेल्या यक्षाची कृश काया नजरेसमोर उभी करते. अशा यक्षाची उदास नजर उगीच आसमंतात फिरते आहे आणि एके दिवशी त्याच्या नजरेला पडतो एक सानुला पावसाळी मेघ. पावसाळी ढग तो. त्याला गजराज हत्तीची उपमा किती शोभून दिसते! हत्तीने पाषाणाला ढुश्या द्याव्यात त्याप्रमाणे हा मेघपर्वत शिखराला भिडतो आहे.
त्या विरही यक्षाच्या लक्षात येते – अरे, पावसाळा आला की !
मग कालिदासाने पुढील श्लोकामध्ये दोन इतक्या सुंदर ओळी लिहिल्या आहेत की, “क्या बात है!’’ अशी दाद दिल्याशिवाय राहवत नाही. आकाशात ढग दाटून आले की, आपलं मन भरून आल्यासारखं वाटतं. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव असेल. काहीतरी अनामिक हुरहुर वाटते ना?
कालिदास म्हणतो –
तो ढगांच्या प्रकाशात आनंदी असतो, जरी तो वेगळ्या अवस्थेत असला तरीही.
एकमेकांना मिठी मारायला आवडते आणि दूर असलेल्या लोकांचे काय?
आकाशात मेघ दाटून आले की, सुखी गृहस्थाश्रमी जीवालाही कसलीशी अनामिक हुरहुर वाटते. मग जिने आलिंगन द्यायचे अशी व्यक्ती दूर असणाऱया विरही जीवाची अवस्था काय होत असेल याची कल्पनाच केलेली बरी ! संस्कृत भाषेचे सौंदर्य काही आगळे आहे. ‘कण्ठाश्लेषप्रणयिनि जने’ याचे अचूक भाषांतर कसे करायचे? जिवलग म्हणा, प्रियजन म्हणा – गळामिठी घालणारी ती व्यक्ती एका शब्दात साकारणे खूप अवघड आहे.
आता याच क्षणी यक्षाला साक्षात्कार होतो की, माझ्या प्रियेला निरोप पोहोचवण्यासाठी या मेघालाच दूत केले तर? पहा, श्लोक क्रमांक चार आहे हा. अवघ्या चार श्लोकांत काव्यातील दोन प्रमुख पात्रांची ओळख होऊन गोष्ट निर्णायक वळणावर आलीसुद्धा ! ही कमाल आहे कालिदासाच्या लेखणीची ! त्याचा आणखी एक विशेष सांगितल्याशिवाय राहवत नाही. प्रतिभेचा असा चमत्कार जगाच्या पाठीवर दुसरा कुठे पाहायला मिळेल असे वाटत नाही. हा त्याचा विशेष म्हणजे अत्यंत वास्तववादी अद्भुत साकारणे. मी असं म्हटल्यावरच तुम्ही विचाराल की, मला नेमके काय म्हणायचे आहे? जे वास्तव नाही तेच अद्भुत किंवा फँटसी असते ना ! मग वास्तववादी अद्भुत म्हणजे काय, तर अद्भुताचेसुद्धा एक तर्कशास्त्र असते बघा. आपल्याला एखादी फँटसी तेव्हाच पटते जेव्हा ती शक्यतेच्या कोटीत बसते, पण कालिदास यातही दोन पावले पुढे आहे. तो स्वतच म्हणतो की, एक निर्जीव ढग यक्षाचा निरोप घेऊन जाईल ही कल्पनाच वेडगळ आहे नाही का? तो मेघ म्हणजे काय माणूस आहे का निरोप घेऊन जायला?
धूर, वीज अन् पाणी, वारा यांही बनला मेघ कुठें तो।
संदेशातें वाहुन नेइल सजीव मानव आणि कुठें तो।
अवगणुनी हे आतुरतेनें यक्ष घनातें करी याचना।
सजीवनिर्जिव विवेक यांतिल कुठुन रहावा प्रणयार्ताना।।
पण मग तोच गुपित सांगतो, “अहो, हे प्रेमी जीव लॉजिकने वागतात कुठे? ‘’ म्हणजे कालिदास कुठेही “हे अद्भुत तुम्ही मान्य करा, समजा’’ असे काही म्हणत नाही. उलट तो म्हणतो “हे शक्य नाही हो!’’ आणि त्याची हुशारी बघा. एकाही श्लोकात तो ढग बोलत नाही. “हो, मी देतो बरं निरोप’’ असेही म्हणत नाही. म्हटलं तर हे नुसतं यक्षाचं एकतर्फी मनोगत आहे, पण हे सांगता सांगता तो आपला विश्वास संपादन करतो. यक्षाच्या त्या कल्पनासृष्टीचे आपणही भाग होतो. हे शक्य नाही असे कवीने आपल्याला स्पष्ट बजावले आहे, पण यक्षाचे मनोगत ऐकता ऐकता वाटू लागते की, हा संवादच आहे. वास्तव आणि अद्भुत याचा हा असा मेळ कुठे बरं पाहायला मिळेल? कालिदासाचे नाव मोजल्यानंतर पुढच्या बोटाला ‘अनामिका’ हे नाव मिळाले ते याचसाठी. इतके पावसाळे आले गेले, पुलाखालून इतके पाणी वाहिले, पण त्याच्यासारखा कुणी झाला नाही, होणार नाही.
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)
Comments are closed.