पावसाळी क्रेव्हिंग्ससाठी ट्राय करा हे 5 हेल्दी पदार्थ
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे अनेक शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून ऑफिसेसमधूनही वर्क फ्रॉम होम देण्यात आलंय. त्यामुळे कित्येकजण या जोरदार पावसाचा आनंद घरी घेत आहेत. बाहेर मुसळधार पाऊस सुरू असला की, खिडकीबाहेर पडणाऱ्या थेंबांसोबतच काहीतरी चटपटीत, मसालेदार खाण्याची इच्छा होते. रिमझिम पावसात चहा आणि भजी या हे दोन्ही पदार्थं तर हमखास केले जातात. गरमागरम भजी, वडे समोर येताच मनमुराद आनंद लुटला जातो. परंतू तळलेली तेलकट भजी खाल्ल्यानंतर वजन वाढण्याची भीती मात्र सतावत राहते. अशावेळी तुम्हाला या पावसात आरोग्याशी तडजोड न करता चमचमीत खाण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर भन्नाट आणि आरोग्यदायी पर्याय स्नॅक्सचे पर्याय पाहूयात.
भजी – नेहमीप्रमाणे बेसन, कांदा, कोथिंबीर आणि मसाल्यांचे पीठ तयार करा. फक्त पीठ थोडे घट्ट ठेवा. एअर फ्रायर ग्रीस करून घ्या आणि 10 ते 15 मिनिटे बेक करा.
खमंग अप्पे – तांदूळ-उडदाच्या पिठाऐवजी तुम्ही रवा आणि दह्याचे किंवा मुगाच्या डाळीचे मिश्रण वापरू शकता. त्यात बारीक चिरलेला कांदा, गाजर, सिमला मिरची आणि हिरवी मिरची घाला. अप्पे पात्रात अगदी 2 ते 3 थेंब तेल टाकून हे अप्पे दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या.
हेही वाचा – पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या
भाजलेले कॉर्न – कणीस गॅसवर किंवा कोळशावर छान भाजून घ्या. त्यावर लिंबाचा रस, काळे मीठ आणि थोडे तिखट चोळा. जर तुम्हाला कॉर्न चॅट हवे असेल, तर मक्याचे दाणे उकडून त्यात कांदा, टोमॅटो आणि चाट मसाला मिक्स करा.
मूग डाळ चिला – मूग डाळ भिजवून त्यात आले, लसूण आणि हिरवी मिरची घालून वाटून घ्या. नॉन-स्टिक पॅनवर अगदी थोडे तूप किंवा तेल लावून हे धिरडे दोन्ही बाजूंनी कुरकुरीत शेकून घ्या.
भाजलेले मखाने – कढईत 1/2 चमचा तूप घालून मखाने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. त्यात हळद, मीठ आणि चाट मसाला टाका. हवे असल्यास त्यात बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो टाकून मखाना चाट बनवू शकता.
पावसाळ्यात आपली पचनसंस्था थोडी मंदावलेली असते. त्यामुळे जास्त तेलकट किंवा रस्त्यावरील उघड्यावरचे अन्न खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. वरील घरगुती आणि आरोग्यदायी पर्याय खाऊन तुम्ही आरोग्याची काळजी घेत पावसाचा मनमुराद आनंद घेऊ शकता.
हेही वाचा – रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे व्हेजिटेबल सूप
Comments are closed.