Mumbai rain news – मुंबईत पावसाचा चौथा बळी; कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईत पावसाचा जोर कायम असतानाच दुर्घटनांचे सत्रही सुरू झाले आहे. कुर्ला पश्चिम भागात रविवारी दुपारी एका दुकानावर भलेमोठे झाड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. युनूस कुंडावाला असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. मुंबईत यंदा पावसाळ्यात झाड कोसळून मृत्यू होण्याची ही तिसरी वेळ आहे, तर एका व्यक्तीचा मृत्यू मॅनहोलमध्ये पडून झाला होता.

पावसामुळे कुर्ला पश्चिम येथील कमानी भागातील गोम्स गाऊन बिल्डिंग, हिंदी बीएमसी शाळेजवळ दुपारी 12 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास एक झाड अचानक शेजारील दुकानावर उन्मळून पडले. या दुर्घटनेत दुकानात असलेले युनूस कुंडावाला हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नगरसेवकांच्या कार्यालयातून रोशन शिंदे यांनी तातडीने या घटनेची माहिती आपत्कालीन यंत्रणेला दिली.

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या कुंडावाला यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या फौजिया रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशामक दल, स्थानिक पोलीस, बेस्टचे कर्मचारी आणि महापालिकेच्या वॉर्ड स्टाफने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ झाडाच्या फांद्या कापून बाजूला करण्याचे काम सुरू केले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजप्रवाह काही काळ खंडित करण्यात आला होता.

धक्कादायक! साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून पादचाऱ्याचा मृत्यू; साडेतीन तासांनंतर अस्लम शेख यांचा मृतदेह आढळला

Comments are closed.