धक्कादायक! अमूल चॉकलेटमध्ये आढळल्या वळवळणाऱ्या आळ्या, अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अकोला : प्रसिद्ध ब्रँड आणि नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या वस्तू किंवा कीटक आढळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आहे. आता असाच एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार अकोला (Akola) जिल्ह्यातून समोर आला आहे. सर्वांचा लाडका ब्रँड असलेल्या ‘अमूल’ कंपनीच्या चॉकलेटमध्ये (Amul Chocolate) चक्क जिवंत आळ्या वळवळताना (Amul Chocolate Worms) आढळून आल्या आहेत. यामुळे अमूल चॉकलेट खाणाऱ्या ग्राहकांमध्ये विशेषतः लहान मुलांच्या पालकांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
अकोल्यातील एका जागरूक नागरिकाने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या गंभीर प्रकारानंतर संबंधित पालकाने अन्न आणि औषध प्रशासनासह ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे.
Akola Kaulkhed Amul Chocolate Worms : मुलासाठी विकत घेतलेल्या चॉकलेटमध्ये निघाल्या आळ्या
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील कौलखेड (Kaulkhed) भागातील रहिवासी संतोष शेंदूरसे (Santosh Shendurse) यांनी आपल्या लहान मुलासाठी जवळच्याच एका दुकानातून अमूल कंपनीचे चॉकलेट खरेदी केलं होतं. मूल चॉकलेट खाण्यासाठी हट्ट करत असल्याने त्यांनी घरी गेल्यावर चॉकलेटचे रॅपर उघडलं. मात्र, चॉकलेट उघडताच त्यांना मोठा धक्का बसला. त्या चॉकलेटवर लहान-लहान जिवंत आळ्या वळवळत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
संतोष शेंदूरसे यांनी वेळीच लक्ष दिल्यानं त्यांचा मुलगा हे चॉकलेट खाण्यापासून वाचला, अन्यथा एका लहान मुलाला मोठ्या अन्नबाधेला (Food Poisoning) सामोरं जावं लागलं असतं. नामांकित कंपन्यांच्या अशा निष्काळजीपणामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचा आरोप आता केला जात आहे.
Amul Chocolate Viral Video : ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संतोष शेंदूरसे यांनी आळ्या असलेल्या अमूल चॉकलेटचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी अमूल कंपनीच्या दर्जावर आणि पॅकेजिंगवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
या संदर्भात संतोष शेंदूरसे यांनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन आणि ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्राकडे (Online Consumer Forum) अधिकृत तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संबंधित दुकानदारावर आणि अमूल कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ही बातमी वाचा:
Comments are closed.