ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं विक्रम रचला,टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं, इंग्लंडचं स्वप्न भंगलं
लंडन : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं तब्बल सातव्यांदा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियासमोर 151 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र बेथ मूनी आणि फोब लिचफिल्डच्या शतकी भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 17 चेंडू बाकी राखून बाजी मारली. मूनीनं 64 धावांची खेळी केली. तर लिचफोल्डनं 48 धावांचं योगदान दिलं. या जेतेपदासह ऑस्ट्रेलियानं आयसीसी महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आपला दबदबा कायम राखलाय. आजवरच्या दहा स्पर्धांपैकी ऑस्ट्रेलियानं तब्बल सात स्पर्धा आपल्या नावावर केल्यायत.
ऑस्ट्रेलियानं लंडनच्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर इंग्लंडला 7 विकेटनं पराभूत केलं आहे. इंग्लंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियानं सातव्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. इंग्लंडच्या संघाचं दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न यानिमित्तानं अपूर्ण राहिलं आहे.
ऑस्ट्रेलियानं या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 4 बाद 150 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 151 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियानं हे आव्हान 17.1 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनी हिनं 49 बॉलमध्ये 10 चौकार मारत 64 धावा केल्या.
इंग्लंडची कर्णधार नॅट साइवर ब्रंट हिनं 53 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीनं 58 धावा केल्या. याशिवाय फ्रेया केम्प हिनं 44 धावा केल्या. इंग्लंडच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. यामुळं इंग्लंडचा संघ 170 धावा करु शकेल असं वाटत असताना त्यांच्या संघ 150 धावा करु शकला. ऑस्ट्रेलिया साठी किम गर्थ, लूसी हॅमिल्टन, एनाबेल सदरलँड आणि कप्तान सोफी मोलिनक्स यांनी 1-1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियानं सातव्यांदा विजेतेपद मिळवलं
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात खराब झाली. टीमनं दुसऱ्याच ओव्हरमध्ये 17 झालेल्या असताना पहिली विकेट गमावली. जॉर्जिया वोल केवळ 9 धावा करुन बाद झाली. यानंतर बेथ मूनी आणि फीबी लिचफील्ड यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 67 बॉलमध्ये 100 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळं ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाजवळ पोहोचला. लिचफील्ड हिनं 35 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 48 धावा केल्या.
तिसऱ्या विकेटसाठी बेथ मूनी आणि एलिस पेरी यांनी 18 बॉलमध्ये 23 धावांची भागीदारी केली. बेथ मूनी ऑस्ट्रेलियाचा 140 धावा झालेल्या असताना बाद झाली. यानंतर एलिस पेरी आणि एश्ले गार्डनर या दोघांनी 7 बॉलमध्ये 13 धावांची भागिदारी करत विश्वविजेतेपद पटकावलं.
Comments are closed.