FIFA World Cup 2026 – मैदानाबाहेर चाहत्यांची झोप उडवणारा हालांड प्रत्यक्ष सामन्यातही नडला; ब्राझीलचा धुव्वा उडवल्यानंतर म्हणाला…
सध्या सोशल मीडियासह जगभरात एकाच नावाची जोरदार चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे एर्लिंग हालांड. मैदान गाजवण्यापूर्वीच आपल्या आक्रमक अंदाजाने प्रतिस्पर्धी संघांचे टेन्शन वाढवणारा हालांड सध्या फुटबॉल विश्वाचा नवा बादशाह ठरत आहे. विशेष म्हणजे, मैदानावर उतरून ब्राझीलला अस्मान दाखवण्यापूर्वीच, हालांडने आपल्या धडाकेबाज फॉर्मच्या जोरावर ब्राझीलच्या कोट्यवधी चाहत्यांची झोप उडवली होती. आणि घडलंही तसंच, वर्ल्ड कप 2026 च्या अत्यंत अटीतटीच्या ‘अंतिम-16’ च्या सामन्यात या वादळाने ब्राझीलच्या अभेद्य तटबंदीला खिंडार पाडले आणि पाच वेळच्या जगज्जेत्यांना थेट स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.
या ऐतिहासिक विजयानंतर प्रतिक्रिया देताना एर्लिंग हालांड कमालीचा भावूक झाला होता. तो म्हणाला, “हा विजय नार्वेच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल. आजचा दिवस आमच्या देशाच्या इतिहासातील सर्वात वेडेपिसे करून सोडणारा आणि आनंदाचा दिवस आहे. सर्वांनी या क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. ब्राझीलसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मिळवलेला हा विजय केवळ आमच्यासाठीच नाही, तर नार्वेमधील लाखो तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल. मला लहानपणी जशी प्रेरणा मिळाली, तसेच आजचे तरुण आमच्याकडे पाहून फुटबॉलकडे आकर्षित होतील. फुटबॉलच्या इतिहासातील हा नार्वेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि अद्भूत विजय आहे.” असं हालांड म्हणाला.
नार्वेचे मुख्य प्रशिक्षक स्टॅल सोलबॅकन यांनीही या ऐतिहासिक कामगिरीबद्दल खेळाडूंचे कौतुक केले. सामना संपल्यानंतर हालांडने मैदानावर ड्रम वाजवून चाहत्यांसोबत पारंपरिक ‘नॉर्वेजियन रो’ (Viking Row) करत जल्लोष केला. या विजयासह नार्वेने थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून, आता मियामीमध्ये त्यांचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. ब्राझीलविरुद्धच्या सामन्यात दोन गोल करत मॅनचेस्टर सिटीच्या या स्टार खेळाडूने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 7 गोल्सची नोंद केली असून, तो ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत लिओनेल मेस्सी आणि किलियन एम्बाप्पे यांच्या बरोबरीने अव्वल स्थानी पोहोचला आहे.
Comments are closed.