FIFA World Cup 2026 – मेक्सिकोचा गेम ओव्हर! थरारक विजयासह इंग्लंडची उपांत्यपूर्व फेरीत धडक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जूड बेलिंगहॅमच्या झंझावाती दुहेरी गोलच्या जोरावर इंग्लंडने यजमान मेक्सिकोवर 3-2 गोल फरकाने बाजी मारत फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सामन्याच्या एका टप्प्यावर इंग्लंडला लाल कार्डमुळे दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. तरीही इंग्लंडने विजयावर शिक्कामोर्तब करत तब्बल 60 वर्षांनंतर मोठे जेतेपद जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या. स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून आता फुटबॉल विश्वाचे लक्ष इंग्लंड आणि नॉर्वे यांच्यात होणाऱ्या महासंग्रामाकडे लागले आहे.

पहिल्या सत्रात अवघ्या 98 सेकंदांच्या अंतराने बेलिंगहॅमने दोन गोल झळकावत मेक्सिकोच्या बचावफळीचा भेद केला. त्यानंतर हॅरी केनने पेनल्टीवर अचूक गोल करत इंग्लंडची आघाडी 3-1 अशी मजबूत केली. मेक्सिकोकडून जुलियान क्विनोनेस आणि राऊल जिमेनेझ यांनी प्रत्येकी एक गोल केला. मात्र यजमानांना पराभव टाळता आला नाही. या विजयासह इंग्लंडने मेक्सिकोच्या ऐतिहासिक एस्टादियो अॅझ्टेका मैदानावरील अभेद्य वर्चस्वालाही धक्का दिला. या मैदानावर मेक्सिकोचा 90 सामन्यांतील हा केवळ तिसरा पराभव ठरला, हे विशेष.

सामन्यापूर्वी मेक्सिको सिटीत मुसळधार पाऊस आणि वादळी वातावरणामुळे सामना तासभर उशिरा सुरू झाला. तरीही तब्बल 80 हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या प्रचंड गदारोळात दोन्ही संघांनी दमदार खेळ केला. सुरुवातीला मेक्सिकोने आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र इंग्लंडचा गोलरक्षक  जॉर्डन पिकपर्ह्ड याने राऊल जिमेनेझचा खात्रीशीर हेडर अप्रतिम झेलत संघाला मोठा दिलासा दिला. त्यानंतर इंग्लंडने सामन्यावर पकड घेतली. बुकायो साकाच्या अचूक क्रॉसवर बेलिंगहॅमने दमदार हेडरद्वारे खाते उघडले. अवघ्या 98 सेकंदांनंतर केनच्या पासवर त्याने दुसरा गोल ठोकत इंग्लंडला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

मात्र मेक्सिकोने हार मानली नाही. क्विनोनेसने गोल करत पुनरागमनाची चिन्हे दाखवली, तर जिमेनेझचे आणखी दोन प्रयत्न पिकफर्डने हाणून पाडले. पहिल्या सत्राअखेरीस बेलिंगहॅमनेच बचावात अप्रतिम हस्तक्षेप करत मेक्सिकोचा संभाव्य बरोबरीचा गोल रोखला.

दुसऱ्या सत्रात इंग्लंडला मोठा धक्का बसला. जारेल क्वान्सा याला व्हीएआरच्या पाहणीनंतर थेट लाल कार्ड दाखवण्यात आले आणि इंग्लंड दहा खेळाडूंवर आला. मात्र त्यानंतरही इंग्लंडचा आक्रमक खेळ कायम राहिला. अँथनी गार्डनला मेक्सिकोचा गोलरक्षक राऊल रँगेल याने पाडल्याने मिळालेल्या पेनल्टीवर केनने अचूक फटका मारत आघाडी 3-1 अशी केली. यानंतर मात्र सामना पुन्हा रंगला. इंग्लंडचा कर्णधार केन याच्याकडून पेनल्टी क्षेत्रात फाऊल झाल्याचा निर्णय देण्यात आला आणि जिमेनेझने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत मेक्सिकोला 2-3 असे इंग्लंडच्या जवळ आणले. अखेरच्या 20 मिनिटांत आणि 11 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत मेक्सिकोने इंग्लंडवर जोरदार हल्ले चढवले. मात्र इंग्लंडच्या बचावफळीने जीव तोडून बचाव करत विजय हातातून निसटणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली.

Comments are closed.