सुरक्षेच्या कारणास्तव दिलजीत दोसांझच्या ‘सतलज’ चित्रपटावर कारवाई, ओटीटीवरून चित्रपट काढण्यात आला
अभिनेता-गायक दिलजीत दोसांझच्या ‘सतलज’ हा चित्रपट ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे. केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान (IT) नियम, 2021 अंतर्गत ZEE5 ला चित्रपट काढून टाकण्याचे निर्देश दिल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. ‘सतलज’ हा चित्रपट 1990 च्या दशकातील पंजाबमधील दहशतवादाच्या काळावर आधारित असून, मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालडा यांच्या आयुष्यावर प्रेरित असल्याचे सांगितले जाते. हा चित्रपट तीन वर्षांहून अधिक काळ प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत होता. अखेर कोणतेही कट न करता तो ZEE5 वर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच रविवारी संध्याकाळी तो प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला.
यापूर्वी सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशन ने चित्रपटामधील तब्बल 127 बदल करण्याची शिफारस केली होती. मात्र, या बदलांमागील कारणांबाबत निर्मात्यांना स्पष्ट माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर निर्मात्यांनी चित्रपट OTT वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. चित्रपट हटवण्याच्या निर्णयावर पंजाबमधील विविध राजकीय पक्ष आणि शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटी यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, दिलजीत दोसांझ यांनीही प्रेक्षकांना चित्रपट जिथे आणि ज्या माध्यमातून शक्य असेल, तिथे पाहण्याचे आवाहन केले आहे. असे वृत्त इंडिया टुडे ने दिले आहे.
दरम्यान, OTT प्लॅटफॉर्मवरील सामग्री ही CBFC च्या अखत्यारीत येत नाही. अशा सामग्रीचे नियमन माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत केले जाते. त्यामुळे या प्रकरणात सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित नियमांनुसार कारवाई केल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.
Comments are closed.