वसई-नालासोपाऱ्याला तीन दिवस पुराचा वेढा; 48 तासांपासून वीज गायब, मोबाईल नेटवर्क ठप्प, अन्न नाही, पाणी नाही… जगाशी संपर्क तुटला! लाखो नागरिकांचे प्रचंड हाल!!

रविवारपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे वसई, नालासोपारा, विरार, नायगाव या शहरांना पुराचा वेढा पडला आहे. मंगळवारपर्यंत सलग तीन दिवस उलटून गेले तरी हजारो कुटुंबे पुरात अडकून पडली आहेत. घराघरात कंबरेइतके पाणी तुंबले आहे. गेल्या 48 तासांपासून वीज गायब झाली आहे. मोबाईल नेटवर्क ठप्प पडले आहे. वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा थेंबही नळाला आलेला नाही. मोबाईलची बॅटरी संपल्याने जगाशी संपर्क तुटला आहे. अन्न नाही, पाणी नाही. त्यामुळे तहानभुकेने अनेकांचे प्राण अक्षरशः पंठाशी आले असून संकटात अडकलेल्या कुटुंबांना कुणाला मदतीसाठी हाकही मारता येत नाही अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

वसई-विरार शहरात वर्षभरात सरासरी 2000 ते 2500 मिमी. पाऊस पडतो. जुलै हा सर्वाधिक पावसाचा महिना. या महिन्यात सरासरी 530 मिमी पाऊस पडतो; पण यंदा अवघ्या पाच दिवसांत 1000 मिमीचा टप्पा पावसाने ओलांडल्याने या शहरांनी कधी नव्हे इतका महापूर अनुभवला. दरवर्षी येणाऱ्या पुराच्या तुलनेत यंदाचा पूर तब्बल पाचपट अधिक भीषण आहे. ठिकठिकाणी वीज टॉवर कोसळल्याने सोमवारपासूनच वीज गायब आहे.

वीज पुरवठा खंडित झाल्याने इमारतींवरील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी चढवता आले नाही. त्यामुळे तीन दिवसांपासून घरातील नळाला पाण्याचा टिपूसही आला नाही. पुराच्या पाण्याचे लोंढे नालासोपारा पूर्व, विरार, वसई, मधुबन, नवघर पूर्व, चुळणे, दिवाणमान, आनंदनगर, शास्त्रीनगर, ओमनगर आणि रेल्वे स्थानक परिसरात शिरल्याने हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला असून, गेल्या तीन दिवसांपासून घराघरात गुडघाभर ते कंबरेपर्यंत पाणी तुंबले आहे. त्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींचे प्रचंड हाल झाले आहेत. वसई पूर्वेतील वसंतनगरी परिसरात एका सोसायटीतील सुमारे 50 कार पुरात बुडाल्या. पुरामुळे दूध व भाजीपाला वाहतूक करणारी अनेक वाहने पोहोचू शकली नाहीत. त्यामुळे दूध, भाजीपाल्यासह अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती घाऊक भाजीपाला व्यापारी राकेश बागल यांनी दिली. तर मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भागांत अडकलेल्या 347 नागरिकांंना सुरक्षित स्थळी आणि तात्पुरत्या निवारा पेंद्रांमध्ये हलविल्याची माहिती आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिली.

आता रोगराईचा धोका

नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच शहरातील बहुतांशी भागातील पाणी ओसरले नसल्याने आता दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

त्वरित नुकसानभरपाई जाहीर करा

तातडीने वीजपुरवठा सुरळीत करा, सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या, अन्न-औषधांचा पुरवठा करा आणि पूरग्रस्त भागातील नागरिकांना त्वरित मदत व नुकसानभरपाई जाहीर करा, अशी मागणी शिवसेनेच्या महिला संघटक किरण चेंदवणकर यांनी केली आहे. चेंदवणकर यांच्या घरात गेल्या तीन दिवसांपासून पाणी नसूनही त्यांनी शिवसैनिकांसह परिसरात मदतकार्य केले.

सर्वाधिक फटका वीज यंत्रणेला

या पूरस्थितीचा सर्वाधिक फटका वीज यंत्रणेला बसला आहे. वसई पश्चिमेतील सनसिटी येथील महावितरणचे मुख्य उपकेंद्र पाण्याखाली गेले असून शहरातील अनेक रोहित्रे वीज वितरण पेटय़ा आणि भूमिगत केबल्स पाण्यात बुडाल्या आहेत.  ठिकठिकाणी रोहित्रांमध्ये बिघाड झाला. महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवला आहे. परिणामी नागरिकांना 48 तासांपासून अधिक काळ अंधारात राहावे लागले आहे.

स्मार्ट सिटीचे पितळ बुडाले

कोटय़वधी रुपयांची विकासकामे आणि पाऊसपूर्व तयारीचे दावे करणाऱ्या प्रशासनाची या महापुराने पोलखोल केली आहे. पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी सक्षम यंत्रणा, नालेसफाई आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. या पुराने वसई-विरारच्या स्मार्ट सिटीचे पितळ उघडे पडले असून ते या पुरात बुडाले आहे, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.

अन्नपाण्यावाचून हवालदिल झालेल्या वृद्ध दांपत्याच्या मदतीला शिवसैनिक धावले

वसई-माणिकपूर येथील ट्रियो यात्री लॉजमध्ये मुक्कामाला असलेले एक वृद्ध दांपत्य या पुराच्या पाण्यात अडकून पडले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही मिळाला नव्हता. ही बाब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत, विरार शहरप्रमुख उदय जाधव यांना कळताच त्यांनी तातडीने साईनगर येथील शाखाप्रमुख प्रणील गोलतकर यांना तातडीने या वृद्ध दांपत्याच्या मदतीला पाठवले. गोलतकर यांनी अन्नाचा व पाण्याचा पुरेसा साठा सोबत घेऊन ट्रियो यात्री लॉज गाठले. त्यामुळे कुणीतरी आपल्या मदतीला येईल याकडे डोळे लावून बसलेल्या त्या दांपत्याचा जीव भांडय़ात पडला.

ऐन गर्दीच्या वेळी डहाणू ते वसई लोकल बंद; चाकरमान्यांची कोंडी

रुळांवर पाणी साचलेले असल्याने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी वसई ते डहाणू लोकल सेवा ठप्प झाली. पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली. अनेक लोकल उशिराने धावत होत्या, तर काही सेवा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले.

वर्क फ्रॉम होम कर्मचारी, विद्यार्थ्यांचे काम ठप्प

गेल्या 60 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने मोबाईल टॉवर्सही बंद पडले आहेत. त्यामुळे नेटवर्कअभावी इंटरनेट सेवा कोलमडली आहे. वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी, ऑनलाइन व्यवसाय करणारे व्यापारी तसेच विद्यार्थ्यांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. इंटरनेट नसल्याने मोबाईल सेवेअभावी वसई-विरारकरांचा संपर्क तुटला आहे.

संसार उद्ध्वस्त, लाखो रुपयांचे नुकसान

घरात पुराचे पाणी, बाहेर रस्त्यावर पाणी आणि घरात ना वीज ना पाणी, ना संपर्क अशी अभूतपूर्व परिस्थिती वसई, नायगाव, नालासोपारावासीयांवर ओढवली आहे. रस्ते, दुकाने, शाळा आणि सार्वजनिक सुविधा ठप्प झाल्या आहेत. अनेक घरांतील अन्नधान्य, घरगुती साहित्य, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

Comments are closed.