सौरव गांगुलीच्या वाढदिवशी चाहत्यांना खास गिफ्ट! ‘दादा’ बायोपिकमधील राजकुमार रावचा फर्स्ट लूक रिलीज
हिंदुस्थानी क्रिकेटचा माजी कर्णधार सौरव गांगुली 8 जुलैला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी चाहत्यांसाठी त्याच्या बहुप्रतीक्षित बायोपिक ‘दादा – द सौरव गांगुली स्टोरी’ चा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात राजकुमार राव सौरव गांगुलीची भूमिका साकारत असून, त्याचा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. राजकुमार रावचा लूक अनेक चाहत्यांना आवडला असून, त्याने गांगुलीची देहबोली आणि व्यक्तिमत्त्व अचूक पकडल्याचे अनेकांनी म्हटले आहे. मात्र, काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पोस्टरवर टीका करत ते कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार केल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
पोस्टरमध्ये राजकुमार राव लॉर्ड्सच्या बाल्कनीत टीम इंडियाची जर्सी हातात फडकावताना दिसतो. हा लूक 2002 मधील ऐतिहासिक नॅटवेस्ट ट्रॉफी विजयानंतर गांगुलीने टी-शर्ट काढून साजरा केलेल्या संस्मरणीय क्षणाची आठवण करून देतो. राजकुमार रावने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फर्स्ट लूक शेअर करत “Happy Birthday Dada” अशी कॅप्शन दिली. पोस्टरवर,”The Sourav Ganguly Story – A man who didn’t just play cricket, he changed it” असा संदेशही देण्यात आला आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.
निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. ‘दादा – द सौरव गांगुली स्टोरी’ हा चित्रपट 17 मे 2027 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून, गांगुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांना मोठ्या पडद्यावर साकारण्यात येणार आहे.
या बायोपिकमध्ये सौरव गांगुलीच्या बालपणापासून हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास दाखवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेटला आक्रमक आणि नवी ओळख देणाऱ्या गांगुलीच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा काळही चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
Comments are closed.