डॉक्टर, नर्सला मारहाण करणाऱ्या मिंधे टोळीच्या नगरसेवकाला बरखास्त करून त्याची डोंबिवलीत परेड काढा; आदित्य ठाकरे कडाडले

केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी रात्री शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टर तसेच तीन महिला परिचारिकांना मारहाण केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. डॉक्टर, नर्सला मारहाण करणाऱ्या मिंधे टोळीच्या नगरसेवकाला बरखास्त करून त्याची डोंबिवलीत परेड काढावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. ते विधान भवन परिसरामध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. तत्पूर्वी विधानसभेमध्येही आदित्य ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित करून नगरसेवकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, आपण सगळ्यांनी तो भयानक व्हिडीओ पाहिला आहे. रमेश म्हात्रे हे भाजपच्या आवडत्या मिंधे टोळीचे नगरसेवक आहेत. अशा गुंडागर्दी करणाऱ्या नगरसेवकाने डॉक्टरवर हात उचलला. एका गर्भवती महिलेला डॉक्टरांनी सांगितले की, त्यांचे मूल कदाचित प्रीमॅच्यूयर असू शकते. जन्मानंतर त्याला एनआयसीयू (NICU) उपचारांची आवश्यकता लागू शकते. पण या रुग्णालयातील NICU चे बेड भरलेले असून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर चांगले होईल. पण या संतापातून महिला डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफवर हात उचलणे योग्य नाही.

भाजप आणि मिंधे टोळीची ही गुंडागर्दी सगळीकडे झालेली असून रमेश म्हात्रेत एवढीच हिंमत असेल तर राम मंदिर लूटणाऱ्यांवर त्याने हात उचलून दाखवावा. उज्जैनची जमीन लुटणाऱ्यांव हात उचलून दाखवावा. डॉक्टर, नर्स यांच्यावरील गुंडागर्दी महाराष्ट्र सहन करणार नाही. या नगरसेवकाला अटक नाही तर बरखास्त करून त्याची डोंबिवलीमध्ये परेड काढली पाहिजे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अद्याप निवेदन दिलेले नाही. त्यांच्याकडून कोणती प्रतिक्रियाही आलेली नाही. मुख्यमंत्र्यांचे हात आता पण कुणीतरी बांधले आहेत का? असा सवाल तर आदित्य ठाकरे यांनी नगरसेवकावर कडक कारवाईची मागणी केली. तसेच याआधी मिंधे टोळीच्या एका आमदाराने आमदार निवासमधील कॅन्टिनमध्ये हात उचलला होता. यांचा डीएनए असा असून गुंडागर्दीचे महागुरूही असेच आहेत. यासाठीच भाजप त्यांना पाळत आहेत, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

गृहमंत्री पदाची पूजा घाला! डोंबिवलीत मिंधे टोळीने डॉक्टर, नर्सला केलेल्या मारहाणीवरून संजय राऊत आक्रमक

राम मंदिरातील दानपेटी सोडली नाही ते आम्हाला हिंदूत्व शिकवत आहेत आणि हे भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत. गेल्या पाच सहा वर्षात ज्यांच्यावर पंतप्रधानांनी आणि भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेतले. बंगाल, आसाम, बिहार आणि महाराष्ट्रातही ईडी, आयटी, सीबीआयमुळए ज्यांना पळावे लागले त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बनवले आणि यांच्याकडून आपण भ्रष्टाचाराविरूद्धच्या कारवाईची अपेक्षा करतोय, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

जबाबदारी झटकून ‘अॅक्ट ऑफ गॉड’चा सहारा घेणाऱ्यांचाही आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला. राम मंदिर लुटले ते पण अॅक्ट ऑफ गॉड बोलणार का? असा सवाल करत आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजप नेते सध्या स्वत:ला देव मानायला लागले आहेत. स्वस्तिक असलेल्या पाटावर बूट घालून उभे राहिलेल्या भाजप नेत्यांचे फोटो आहेत. मंदिरातही बूट घालून जाणारे भाजप नेते आहेत. काल नितीन नबीन यांच्या समोर हनुमानाला नाचवले. ते स्वत:ला देव मानायला लागले आहेत का? भाजपने राम मंदिरातील दानपेटी लुटली. आमचे स्वप्न होते राम मंदिर व्हावे आणि पक्ष म्हणून आणि वैयक्तिकही आम्ही निधी दिला होता. राम मंदिर ट्रस्ट, चंपत राय यांच्यावर विश्वास ठेवला होता. पण त्यांनीच विश्वासघात केला. फक्त आमचाच नाहीतर करोडो हिंदूंचा विश्वासघात केला. त्यांना ज्यांनी नेमले त्या भाजपला प्रश्न कधी विचारणार आहात. हिंदूत्वासाठी पळून गेलेले खासदार आणि मिंधे गट भाजपकडे चौकशीची मागणी करणार का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

Comments are closed.