Ratnagiri News – दापोलीत वीज संकटावर नागरिकांचा संताप; महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा
दापोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या वीज संकटाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अनेक गावांमध्ये सलग चार ते पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. यामुळे संतप्त झालेल्या वळणे येथील एमआयडीसी परिसरातील उद्योजक तसेच वीजबाधित गावांतील नागरिकांनी महावितरणच्या काळकाई कोंड येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून दापोली तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले असून झाडेही वीजवाहिन्यांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी अनेक गावे अंधारात असून नागरिकांना पिण्याचे पाणी, मोबाईल चार्जिंग, दैनंदिन कामकाज तसेच शेतकरी व व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठून वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देत वीजपुरवठा सुरळीत करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. कोसळलेले वीज खांब, तुटलेल्या तारा आणि रस्त्यांवर पडलेली झाडे यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीने युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू असून वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. वीजपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला.
Comments are closed.