इंग्लंडच्या फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, भारताविरुद्ध खेळणार शेवटचा सामना
इंग्लंडची फलंदाज टॅमी ब्यूमॉंटने (Tammy Beaumont) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारी (१० जुलै) सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यानंतर ती निवृत्त होणार आहे. हा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे.
३५ वर्षीय ब्यूमॉंटने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तेव्हापासून तिने इंग्लंडसाठी २६० सामने खेळले आहेत. त्यामध्ये ११ कसोटी, १४० वनडे आणि १०९ टी २० सामन्यांचा समावेश आहे. १२ शतकांसह ती इंग्लंड महिला संघाची आघाडीची वनडे शतकवीर आहे.
ब्यूमॉंट इंग्लंडची माजी कर्णधार हेथर नाईटसोबत तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या केवळ दोन महिला आणि पाच इंग्लिश क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
“जवळपास १७ वर्षे इंग्लंडकडून खेळणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. लहानपणी जेव्हा मला क्रिकेटची आवड निर्माण झाली, तेव्हा इंग्लंडकडून क्रिकेट खेळणे हा एक पर्याय असू शकतो, हे मला माहीतही नव्हते. विशेषतः या उन्हाळ्यात कितीतरी मुली आणि मुलांना प्रेरणा मिळाली आहे आणि आपल्या देशात हा खेळ किती पुढे आला आहे, याचा विचार करून मला खूप आनंद होतो,” असे ब्यूमॉंटने म्हटले आहे.
इंग्लंडमध्ये २०१७ ला झालेल्या विजयी वनडे विश्वचषकात ब्यूमॉंट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरली होती. त्या स्पर्धेत तिने ९ डावांमध्ये ४५.५५च्या सरासरीने ४१० धावा केल्या होत्या. (England Cricketer Tammy Beaumont to retire from International Cricket will play final match against India at Lord’s Test)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही ब्यूमॉंट देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत राहणार आहे. तिने आतापर्यंत खेळलेल्या ११ कसोटी सामन्यांमध्ये एका शतकासह ६१२ धावा आणि १४० वनडे सामन्यांमध्ये ४७३८ धावा केल्या आहेत. तिने वनडेमध्ये १२ शतके आणि २४ अर्धशतके केली आहेत.
Comments are closed.