पाकिस्तान क्रिकेटचा अजब कारभार! ज्या बाबर आझमला टी20 संघातून काढलं, त्याच्याच हातात पुन्हा नेतृत्वाची धुरा?
पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan cricket team) सध्या सुरू असलेला गोंधळ थक्क करणारा आहे. 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर ‘सर्जरी’च्या नावाखाली स्टार फलंदाज बाबर आझमला (Babar Azam) टी20 संघातून वगळण्यात आले होते. मात्र, काही काळानंतर कोणतीही मोठी कामगिरी नसतानाही त्याची संघात पुन्हा वर्णी लागली.
आश्चर्य म्हणजे, 3 वर्षांच्या अंतराने त्याला अचानक कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि आता पुन्हा एकदा त्याला टी20 संघाचा कर्णधार बनवण्याची चर्चा सुरू आहे.
रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) संघाच्या अलीकडील कामगिरीचे मूल्यांकन करत असून टी20 फॉरमॅटमध्ये नेतृत्वात बदल करण्याचा विचार करत आहे. जर बाबर आझमची टी20 कर्णधार म्हणून नियुक्ती झाली, तर तो सलमान अली आगाची जागा घेईल. यावर बोर्ड लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, बाबर आझमचा कर्णधारपदाचा अनुभव पाहता त्याला पुन्हा तिन्ही फॉरमॅटचे नेतृत्व सोपवले जाऊ शकते, मात्र पीसीबीकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने टी20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली होती; 2021 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये संघ उपांत्य फेरीपर्यंत (semifinal) पोहोचला होता, तर 2022 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान उपविजेता (runner-up) ठरला होता.
सध्याचा टी20 कर्णधार सलमान अली आगा याला बोर्ड खेळाडू म्हणून महत्त्वाचे मानत असून तो भविष्यातील योजनांमध्ये कायम असेल. बाबर आझम हा व्हाईट-बॉल क्रिकेटमधील पाकिस्तानचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज आहे आणि त्याचा अनुभव, नेतृत्व क्षमता व नेतृत्वाची समज या गोष्टी त्याला पुन्हा कर्णधार बनवण्यासाठी बोर्डाच्या विचारांना प्रभावित करत आहेत.
Comments are closed.