Ratnagiri News – मंडणगड-म्हाप्रल रस्त्यावरील शेनाळे येथे दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे ठप्प

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मंडणगड तालुक्यात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील मातीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपल्याने अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातच, मंडणगड-म्हाप्रल दरम्यानच्या रस्त्यावरील शेनाळे गावाच्या हद्दीत, देशमुख बागेजवळ डोंगराची मोठी दरड कोसळली. रस्त्यावर मातीचे ढीग, मोठमोठे दगड आणि झाडे-झुडपे आल्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक आता पूर्णपणे बंद पडली आहे.

हा मार्ग नव्याने तयार होत असलेल्या ‘लोणंद-राजावाडी ते आंबडवे’ या राष्ट्रीय महामार्गाचा भाग असून, तो मंडणगड, दापोली आणि खेड तालुक्यातील गावांना मुंबई, पुणे व ठाणे या शहरांशी जोडणारा प्रमुख दुवा आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील आंबेत पुलाखाली बार्ज अडकल्याने तिथली वाहतूक आधीच बंद करण्यात आली आहे. ही समस्या ताजी असतानाच, आता शेनाळे येथील देशमुख बागेजवळ दरड कोसळल्याने प्रवाशांसमोर आपत्तीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या दुहेरी संकटामुळे परिसरातील वाहनचालक आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

Comments are closed.