Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Sanjay Raut and Sharad Pawar: ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशाप्रकारच्या बैठका घेतल्या तर यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते, असे वक्तव्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शरसंधान साधले. काल शरद पवार हे एका बैठकीच्यानिमित्ताने विधानभवनात गेले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात त्यांनी आपल्या पक्षाची बैठक घेतली. एकनाथ शिंदे यांनीही मंत्रिमंडळाची बैठक सोडून दालनात येऊन शरद पवार यांचे स्वागत केले होते. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, शरद पवार हे मोठे नेते आहेत. पण ज्या एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड आणि गद्दारीची वाळवी लावली, त्यांच्या दालनात बैठक घेणे योग्य नाही. अख्खं विधानभवन ओस पडलं होतं का, विधानभवनाच्या परिसरात समोर राष्ट्रवादी भवन आहे, शिवसेना भवन आहे, ते कमी पडलं म्हणून विधिमंडळात भेटी घेतल्या जातात, बैठका घेतल्या जातात. यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विश्वासार्हता कमी होते. आम्ही अजित पवारांच्या दालनात जाऊन बैठक घेतली असती तर आम्ही मविआच्या विरोधात गेलो, असा अर्थ होतो. त्यामुळे मविआच्या घटकपक्षांनी नियम पाळायला पाहिजेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Maharashtra Politics News)
हे आमच्यासारख्या निष्ठावंताचं मत आहे. आम्ही इतकेही सहिष्णु नाही, एवढं आमचं मन मोठं नाही, ज्यांचं ते आहे, त्यांनी ते करावं. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासहर्ता कमी होते, असे संजय राऊत यांनी म्हटले. शरद पवारांच्या कृतीमुळे सगळेच दुखावले गेले असतील. आम्ही त्यांच्या जागी असतो तर आम्ही अजितदादांच्या दालनात जाऊन बैठक घेतली नसती. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्र्यांना भेटणे यामध्ये काहीही गैर नाही. काल विधानभवनात बैठक होती, त्यासाठी शरद पवार आले होते. ही बैठक महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी होती. त्या बैठकीत काय घडलं, हे बाहेर आलं नाही. या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी किती प्रमुख नेत्यांना बोलावलं होतं, हे मला सांगा ना. शिवसेना या चळवळीतील महत्त्वाचा पक्षकार आहे. आपले वकील सुप्रीम कोर्टात सीमाप्रश्नाच्या खटल्यावेळी का उपस्थित राहत नाहीत? मराठी माणूस सीमाभागात काय हाल भोगतोय, किती वर्षे हा खटला प्रलंबित आहे, याची मुख्यमंत्र्यांना काय जाणीव आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Comments are closed.