लॉर्ड्सच्या 142 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार 'हा' विक्रम; भारत-इंग्लंड सज्ज

लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडला क्रिकेटचे ‘मक्का’ मानले जाते. जगातील प्रत्येक क्रिकेटपटूचे या ऐतिहासिक मैदानावर किमान एकदा तरी खेळण्याचे स्वप्न असते. मात्र, ही संधी प्रत्येकालाच मिळते असे नाही. महिला क्रिकेटच्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती. आता, लॉर्ड्सच्या 142 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांची कसोटी (Test match) खेळली जाणार असून, हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

10 जुलै रोजी भारत आणि इंग्लंडचे महिला संघ लॉर्ड्सवर एका एकमेव कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरतील. महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात या दोन संघांमधील हा लॉर्ड्सवर खेळला जाणारा पहिलाच कसोटी सामना असेल. त्यामुळे, या ऐतिहासिक सामन्याबाबत भारतीय आणि इंग्लंड अशा दोन्ही संघांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी लॉर्ड्सवरील या कसोटी सामन्याबद्दल आनंद व्यक्त केला, तसेच इतक्या वर्षांनंतर असा सामना होत असल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, खेळाडू या संधीची आतुरतेने वाट पाहत आहेत. टी-20 विश्वचषकापूर्वीपासूनच संघात या सामन्याबाबत चर्चा सुरू होती, असेही त्यांनी नमूद केले.

आपल्या कारकिर्दीत 171 प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या मुजुमदार यांनी म्हटले, “लॉर्ड्सवर महिलांची पहिलीच कसोटी खेळली जात आहे, हे आश्चर्यकारक आहे. तरीही, या ऐतिहासिक क्षणाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. हे शक्य करण्यासाठी ज्यांनी योगदान दिले, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. ही एक मोठी संधी आहे आणि आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत.”

ते पुढे म्हणाले, “कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूसाठी कसोटी सामना खेळणे हे एक मोठे स्वप्न असते. त्यातही, लॉर्ड्ससारख्या ऐतिहासिक मैदानावर कसोटी खेळण्याची संधी मिळणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. उद्या पांढरी जर्सी परिधान करून लॉर्ड्सच्या मैदानावर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला या क्षणाचा नक्कीच अभिमान वाटेल.”

Comments are closed.