भाईंदरमध्ये घुमला रामरक्षाचा जयघोष, दानपेटीवर दरोडा टाकणाऱ्यांविरोधात शिवसेनेचे आंदोलन
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर दरोडा टाकणाऱ्यांविरोधात आज मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलन करून रामरक्षाचा जयघोष केला. सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या पैशाची लूट थांबवून जबाबदारीने कारभार करावा तसेच संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी श्रीरामाकडे साकडे घातले. आंदोलनास शिवसैनिकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाईंदर येथील श्रीराम मंदिरात शिवसेनेच्या वतीने रामरक्षा स्तोत्राचे सामूहिक पठण आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशातील मंदिरांच्या सुरक्षेकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी करण्यात आली. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महिला जिल्हा संघटक नीलम ढवण, सचिव सुभाष केसरकर, उपजिल्हाप्रमुख धनेश पाटील, उपजिल्हा संघटक हेमलता जोशी, कांचन लाड, उपजिल्हा संघटक कल्पना शिगवण, शहर संघटक, श्रेया साळवी, उपशहरप्रमुख पांडुरंग पवार, राजन येरूनकर विश्वास घाग, विभागप्रमुख जयवंत पाटील, उपशहरप्रमुख नाना धाडीवाल, वनिता महाडिक, अस्मिता परुळेकर, मीना सरमळकर, शाखाप्रमुख मंगल जाधव आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
मंदिरांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या!
मंदिरांवर दरोडा टाकण्यापेक्षा देशातील मंदिरांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. तसेच देशात शांतता, सुव्यवस्था राखावी अशी प्रार्थना यावेळी मंदिरात रामरक्षा आणि महाआरती करण्यात आली. भ्रष्टाचाराचा तीव्र निषेध करत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Comments are closed.