भंडाऱ्याच्या जिल्हा शल्य चिकित्सकाने २८.५० कोटींचं टेंडर काढलं, फर्निचर सप्लायरकडून घेतलं रुग्णालयाचं सामान! अनिल परबांनी सभागृहात उघड केलं भ्रष्टाचाराचं प्रकरण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्याच्या विधानसभेत भंडाऱ्यातील आरोग्य विभागातील एका मोठ्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. भंडाऱ्याच्या जिल्हा शल्य चिकित्सकाने तब्बल २८ कोटी ५० लाख रुपयांचे टेंडर काढून रुग्णालयाचे वैद्यकीय साहित्य चक्क एका फर्निचर सप्लायरकडून खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी सभागृहात उघड केला.

सभागृहात या गंभीर मुद्द्यावर लक्ष वेधताना अनिल परब यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. भंडाऱ्याच्या जिल्हा शल्य चिकित्सकाने रुग्णालयाच्या साहित्यासाठी काढलेले २८.५० कोटी रुपयांचे मोठे टेंडर प्रिया कुलर नावाच्या एका फर्निचर सप्लायरला देण्यात आले. वैद्यकीय साहित्याशी कोणताही संबंध नसलेल्या आणि केवळ फर्निचर पुरवणाऱ्या संस्थेकडून रुग्णालयाचे महत्त्वाचे सामान खरेदी करण्यात आल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर मोठा संशय निर्माण झाला आहे. या एकाच प्रकरणावरून तिथे किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे हे स्पष्ट होते, असे परब म्हणाले आहेत.

एवढा मोठा गैरव्यवहार उघडकीस येऊनही संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, याकडे लक्ष वेधत त्यांनी राज्य सरकारला थेट जाब विचारला. या भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकावर तातडीने कारवाई करून त्यांना निलंबित करणार का, तसेच केवळ भंडाराच नव्हे तर राज्यभरात होणाऱ्या अशा स्वरूपाच्या भ्रष्टाचारांवर सरकार कठोर कारवाई करणार का, असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.

Comments are closed.